27.5 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रकांद्याने शेतकरी होणार मालामाल !

कांद्याने शेतकरी होणार मालामाल !

नगर : प्रतिनिधी
कांद्याचे भाव मागील काही दिवसांपासून चांगलेच तेजीत आले आहेत. २० रुपये किलोपासून तर आता थेट ४५ रुपयांवर कांदा आला आहे. त्यामुळे शेतक-यांत समाधानाचे वातावरण आहे. कांद्याचे भाव ५००० रुपये प्रतिक्विंटलवर जाऊ शकतात असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे यंदा कांद्याने शेतकरी मालामाल होतील असे म्हटले जात आहे.

अहमदनगरमधील बाजार समित्यांत कांद्याचे दर चार हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. समित्यांमध्ये कांद्याची आवक ही सरासरीपेक्षा निम्म्याने घटली आहे. त्यामुळे पुढील काळातही दर चांगले राहतील अशी शक्यता आहे.
बाजार समितीत गुरुवारी कांद्याला ३९०० ते ४१०० रुपये क्विंटल दर मिळाले. काही ठिकाणी गोणीतील कांद्याचे दर ४३०० ते ४५०० रुपयांवर पोहोचले आहेत. शेतक-यांमध्ये त्यामुळे समाधानाचे वातावरण आहे. नाशिकनंतर नगर जिल्ह्यात कांद्याचे मोठे उत्पादन होते. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात पाच ते सहा लाख गोण्यांची आवक होत असते. यंदा मात्र पाण्याअभावी उत्पादनात मोठी घट झाली आहे.

त्यामुळे आवक अवघी अडीच ते तीन लाख गोण्यांची होत आहे, अशी माहिती येथील समितीचे सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली. लाल कांद्याच्या उत्पादनास अजूनही मोठा अवधी आहे. त्यातच जास्त पावसामुळे लाल कांदा खराब होण्याची भीती आहे.

त्यामुळे कांद्याचे दर आणखी वाढतील असा अंदाज आहे. दक्षिण भारतातील कांदा उत्पादनाला अजून महिनाभराचा अवकाश आहे. त्यामुळे कांद्याचे दर पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत जातील, अशी माहिती व्यापा-यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR