23.4 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeराष्ट्रीयम्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले

म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले

सुरक्षा सल्लागारांचा दुजोरा, चिंता वाढली

नवी दिल्ली : हिंसाचाराने ग्रासलेल्या मणिपूरमध्ये आता म्यानमारमधील अतिरेक्यांच्या घुसखोरीमुळे आता चिंता वाढली आहे. शेजारच्या म्यानमारमधून मणिपूरमध्ये ९०० कुकी अतिरेक्यांच्या प्रवेशाबद्दल आणि सशस्त्र ड्रोनच्या वापराबद्दल गुप्तचर अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत शनिवारी सुरक्षा सल्लागारांनी दुजोरा दिला आहे. मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या गुप्तचर अहवालाला हलक्यात घेता येणार नाही.

दुसरीकडे, उच्च गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, दक्षिण मणिपूरमधील भारत-म्यानमार सीमेवरील जिल्ह्यांच्या सर्व वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना गुप्तचर अहवाल पाठविण्यात आला आहे. गुरुवारी पाठवलेल्या अहवालात नमूद केले आहे की, ९०० कुकी अतिरेक्यांनी अलीकडेच ड्रोन-आधारित बॉम्ब, प्रोजेक्टाइल, क्षेपणास्त्रे आणि जंगल युद्धाचे प्रशिक्षण घेतले आहे आणि त्यांनी म्यानमारमधून मणिपूरमध्ये प्रवेश केला आहे.

कुकी अतिरेकी प्रत्येकी ३० सदस्यांच्या तुकड्यांमध्ये विभागले गेले आहेत आणि सध्या ते वेगवेगळ्या भागात विखुरलेले आहेत. ते सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मैतेई गावांवर हल्ले करू शकतात, असेही अहवालात म्हटले आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेत कुलदीप सिंह म्हणाले की, हा अहवाल १०० टक्के बरोबर आहे. जोपर्यंत तो चुकीचा सिद्ध होत नाही तोपर्यंत, आम्ही तो १०० टक्के अचूक असल्याचे मानतो, कारण तुम्हाला कोणतेही इंटेलिजन्स इनपुट १०० टक्के अचूक असल्याचे गृहीत धरले पाहिजे आणि त्यासाठी तयार राहिले पाहिजेत.

कुलदीप सिंह पुढे म्हणाले की, म्यानमारमधील चिन प्रांत आणि इतर राज्यांमधील कुकी आणि वांशिक सशस्त्र गट जुंटा यांच्यात संघर्ष होत आहे. त्यांनी देशाचा मोठा भाग ताब्यात घेतला आहे, जो पूर्वी जुंटाच्या ताब्यात होता. काही संघर्ष भारतीय सीमेजवळ झाला आहे, त्यामुळे सीमेला लागून असलेल्या भागातील सैनिक पळून भारतात येण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. त्यांचा पाठलाग करताना बिनी प्रांतातील बंडखोरही भारतात घुसण्याच्या प्रयत्न करतात.

काही जिल्हे हाय अलर्टवर
१ सप्टेंबरपासून वाढलेल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत कुलदीप सिंह म्हणाले की, १८ सप्टेंबर रोजी स्ट्रॅटेजिक ऑपरेशन ग्रुपची बैठक झाली आहे. यामध्ये सुरक्षा यंत्रणांना एकत्रितपणे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याशिवाय गुप्तचर अहवालांवरही चर्चा करण्यात आली आहे. गुप्तचर अहवालाबाबत एजन्सीच्या उच्च अधिका-यांना माहिती देण्यात आली आहे. याशिवाय चुराचंदपूर, फेरजौल, टेंगनोपाल, कमजोंग आणि उखरुल जिल्ह्यांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR