नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यासह देशात कांदा उत्पादन ५७ टक्क्यांनी वाढणार आहे. त्यामुळे कांद्याचे भाव गडगडणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकारच्या निर्यात धोरणात सातत्य नसल्याचा आरोप शेतक-यांनी केला. तसेच तत्काळ निर्यात शुल्क रद्द करावे अशी मागणी शेतकरी आणि कांदा निर्यातदारांनी केली आहे.
नाशिक जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला. त्यामुळे कांद्याची उत्पादन क्षमता ५७ टक्क्यांनी वाढणार असल्याचा अहवाल केंद्राकडे नुकताच प्राप्त झाला आहे. निर्यातदारांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा कांदा लागवड क्षेत्र वाढणार असल्याने भाव गडगडू शकतात.
३० ते ३५ दिवसांत मोठ्या प्रमाणात बाजारात कांदा दाखल होणार आहे. त्यामुळे कांद्याचे भाव खाली येऊ शकतात. सरकारने कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी निर्यात शुल्क रद्द करून निर्यातीवर सबसिडी दिल्यास कांदा उत्पादक शेतक-यांना याचा फायदा होईल.
राज्यात चांगला पाऊस आणि कांद्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्यानं रबी आणि उन्हाळी कांदा लागवड गतवर्षाच्या तुलनेत ७० हजार हेक्टरने वाढून ५.३५ लाख हेक्टरवर गेली आहे. रबी हंगामात १०६ लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. राज्यातील एकूण कांदा साठवणूक क्षमता फक्त ३१ लाख टन असल्यामुळे आणि निर्यात धोरणात सातत्य नसल्याने यंदाही कांदा दरात घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
निर्यातीसाठी अनुदान द्यावे
यंदा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली आहे. केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी धोरण आखणे गरजेचे आहे. कांद्याची लागवड वाढल्याने जास्तीत जास्त कांदा परदेशात कसा निर्यात होईल, याकडे केंद्र सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी निर्यात शुल्क शून्य करून केंद्र सरकारने निर्यातीवर सबसिडी, अनुदान दिल्यास त्याचा फायदा होईल. असे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानने केली बाजारपेठ काबीज
यंदा देशात ५७ टक्के अधिक कांद्याची लागवड झाली आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान आणि बंगाल या भागात देखील कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. निर्यातदारांसाठी यंदा पाकिस्तान आणि येमेन हे दोन देश आपल्यासाठी मोठे आव्हान आहेत. तसेच भारताने मागील वर्षी निर्यात बंदी केल्याने सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनामचे कांदा मार्केट पाकिस्तानने काबीज केले आहे. त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की, त्यांनी निर्यात शुल्क रद्द करावे.