अहिल्यानगर : प्रतिनिधी
अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नॉट रिचेबल राहणा-या भाऊसाहेब कांबळेंनी विश्वासघात केला. तुम्हाला माझा पाठिंबा नाही आणि क्षमाही नाही. कांबळे माझे फोटो लावू नका, अशा तिखट शब्दांत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी श्रीरामपूरचे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना सुनावले. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचार सभेदरम्यान राधाकृष्ण विखे पाटलांनी भाऊसाहेब कांबळेंचा चांगलाच समाचार घेतला.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाल्याचे बघायला मिळत आहे. महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवतायत, तर त्याचबरोबर शिवसेनेने देखील इथे भाऊसाहेब कांबळेंना धनुष्यबाणावर उमेदवारी दिली आहे. जागावाटपात श्रीरामपूरची जागा राष्ट्रवादी काँँग्रेसला गेल्याने भाऊसाहेब कांबळे यांनी उमेदवारी मागे घेणे अपेक्षित होते.
मात्र, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ते नॉट रिचेबल होते. त्यानंतर आता त्यांनी जोरदार प्रचार देखील सुरू केला. पण प्रचारादरम्यान कांबळेंच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महसूलमंत्री विखे पाटलांचा फोटो दिसत असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतोय. त्यामुळे विखे पाटलांनी कांबळेंना आपला फोटो बॅनरवरून काढण्यात यावा, असे सांगितले.