लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने महावितरणच्या लातूर परिमंडलातील ४६ वीज कर्मचा-यांचा मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांच्या हस्ते गुणवंत कर्मचारी पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यामध्ये ७ यंत्रचालक तर ३९ तंत्रज्ञ कर्मचा-यांचा समावेश आहे. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त कर्मचा-यांचा गौरव करत वीजसेवेच्या क्षेत्रातील बदलत्या आव्हानास सामोरे जात ग्राहकाभिमुख सेवा देण्याबरोबरच अपघात विरहीत व सुरक्षीत सेवा देण्यासाठी आपण सतर्क असायला हवं, असे विचार मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी व्यक्त केले.
परिमंडळ कार्यालयात पार पडलेल्या गौरव सोहळयात ग्राहकाभिमुख सेवा देत वीजग्राहकांच्या मनामध्ये महावितरणबाबत सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यात योगदान देणा-या ४६ तांत्रिक कामगारांचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देवून गुणवंत कामगार म्हणून गौरव करण्यात आला. यामध्ये लातूर जिल्हयातील २० कामगारांचा, बीड जिल्हयातील १४ कामगारांचा तर धाराशीव जिल्हयातील १२ कामगारांचा समावेश आहे. या गौरव सोहळया प्रसंगी मुख्य अभियंता अरविंद बुलबुले पुरस्कारप्राप्त कर्मचा-यांना शुभेच्छा देत म्हणाले की, आज विजेच्या क्षेत्रात काम करत असतांना ग्राहक सेवेला प्राधान्य देत महावितरणच्या यशामध्ये भर टाकण्याचं महत्वपुर्ण काम तांत्रिक कामगारांकडून होत आहे. महावितरण प्रशासनाने नव्याने सुरू केलेल्या अत्याधूनिक सेवा आत्मसात करत कंपनीचा हिताच्या दृष्टिनेच सर्व कामगारांनी कार्यरत राहीले पाहिजे. सोबतच होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी वीजयंत्रणेची देखभाल दुरूस्ती करत असताना कंपनीने दिलेल्या सुरक्षा साधनाचा वापर करत काम करावे. उपकेंद्रातील आर्थिंग वारंवार तपासणे, डिस्चार्ज रॉड वापरणे तसेच रीतसर परमीट घेवूनच काम करणे याबाबीकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, असे विचारही बुलबुले यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी गौरव सोहळयाचे प्रास्ताविक व आभार उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर यांनी केले. तर सुत्रसंचालन प्रमोद गरड यांनी केले. यावेळी लातूर मंडळाचे अधीक्षक अभियंता मदन सांगळे, सहायक महाव्यवस्थापक चेतन वाघ, कार्यकारी अभियंता गणेश सामसे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.