लातूर : प्रतिनिधी
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतची, या सुखाची उपमा नाही त्रिभूवणी… या अभंगाप्रमाणे कार्तीकी पंढरपूर वारीसाठी लातूर जिल्ह्यातून दरवर्षी मोठया प्रमाणात भाविक भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. कार्तीकी पंढरपूर वारी करणा-या भाविक-भक्तांची सोय व्हावी, म्हणून एसटी महामंडळाच्या लातूर विभागीय कार्यालयाने ३० जादा बसेसचे नियोजन केले असून त्या बसेस भाविकांच्या सेवेत धावत आहेत. कार्तीकी यात्रा १७ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे.
पंढरपूर कार्तीकी वारी आली की, विठ्ठलभक्तांना वेध लागतात ते विठुरायाच्या भेटीचे. त्यामुळे राज्यभरातील भाविकांसह लातुरातील भाविकभक्तही विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. आषाढी वारी नंतर अनेक भाविकांना विठूरायाच्या दर्शनाची आस लागली आहे. या भाविकांची सोय व्हावी, म्हणून लातूर विभागीय कार्यालयाने ३० जादा बसेसचे नियोजन केले आहे. यात लातूर आगारातून १०, निलंगा आगारातून ३, उदगीर आगारातून ५, औसा आगारातून ९, तर अहमदपूर आगारातून ३ बसेस दि. ९ ते १७ नोव्हेंबर पर्यंत धावणार आहेत. या यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार दि. १२ नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशी असणार आहे. त्यामुळे या कार्तीकी पंढरपूर यात्रा कालावधीत २१ लाख ८४ हजार रूपयांचे उत्पन्न मिळेल, असे नियोजन लातूर विभागीय कार्यालयाने केले आहे.
एसटी महामंडळाच्या लातूर विभागाने गेल्यावर्षी पंढरपूर कार्तीकी वारीसाठी लातूर, औसा, निलंगा, अहमदपूर व उदगीर आगारातून ३३ बसेस सोडण्यात आल्या होत्या. यात्रा कालावधीत या बसेसनी १७८ फे-या मारून ४० हजार ३३६ कि. मी. अंतर पार करत १० लाख ४१ हजार ५८७ रूपयांचे उत्पन्न मिळवले होते. यावर्षी ३० बसेसच्या माध्यमातून कार्तीकी पंढरपूर यात्रा कालावधीत २१ लाख ८४ हजार रूपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.