30.7 C
Latur
Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रकार-ट्रकच्या भीषण अपघातात ३ ठार

कार-ट्रकच्या भीषण अपघातात ३ ठार

एक जखमी, उदगीर तालुक्यातील करडखेल पाटीजवळ दुर्घटना
उदगीर : प्रतिनिधी
तालुक्यातील करडखेल पाटीजवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भीषण दुर्घटनेत तिघांचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. यावेळी बाजूने जात असलेल्या दुचाकीवरील व्यक्तीला किरकोळ मार लागला आहे.

करडखेल पाटीवर ट्रक (क्र. ए. पी. ३९ टी ३६८६) आणि कार (क्र. एमएच २४ व्ही ०१६३) यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात यादव तुळशीराम काळे (५८, रा. सुगाव ता. चाकूर), बब्रूवान मारुती मेखले (७३, रा. सुगाव, ता. चाकूर) आणि विठ्ठल बाबूराव यचवाड (७७, रा. अखरवाई ता. लातूर) यांचा मृत्यू झाला तर हुजूर दुलरखा पठाण (५६, रा. सुगाव, ता. चाकूर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र हेर येथून तात्काळ उदगीर येथे व उदगीरहून लातूर येथे हलवण्यात आले.

लातूर जिल्ह्यातील मूळचे असणारे माजी सैनिक हे बिदरला गेले होते. तेथून गावाकडे परत येत असताना उदगीर तालुक्यातील करडखेल पाटी येथे कार आणि ट्रॅकची भीषण धडक झाली. या अपघातात कारमधील चार माजी सैनिकांपैकी ३ जणाचा जागीच मृत्यू झाला. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यात कारचा समोरचा भाग अक्षरश: चेंदामेंदा झाला.

यावेळी ग्रामीण पोलिस स्टेशनचे बीट अंमलदार राहुल नागरगोजे, पोलिस कॉन्स्टेबल बाळासाहेब गडदे आणि नाना शिंदे, पोलिस पाटील एकनाथ कसबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांचा पंचनामा केला आणि मृतदेह शिवविच्छेदनासाठी हेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा पुढील तपास सुरू आहे. अपघातस्थळी वाहनांच्या दोन्ही बाजूने लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR