बीड : प्रतिनिधी
कालिचरण महाराज यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरात हिंदू जनजागरण सभा घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणा-या मनोज जरांगे पाटलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.
यावर आता सकल मराठा समाजाकडून तिखट प्रतिक्रिया देण्यात आली आहे. यातून कालिचरण महाराजांच्या वक्तव्याचा मराठी समाजातर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे.
कालीचरण महाराज यांनी हिंदू जनजागरण सभेत बोलताना म्हटले होते की, आता एक आंदोलन हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी झाले. कशी हवा होती त्या आंदोलनाची, लाखो लोक मुंबईत आले होते. त्यांच्या नेत्याने थडग्यावर चादर चढवली. यांचा नेता हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे राक्षस. हिंदू लोक मतदानालाच जात नाहीत तर मग राजा कोण येणार तर मुसलमानाचे पाय चाटणारा. हिंदू मतदान करतील तर कट्टर हिंदू राजा होईल. जर तुम्ही पेट्रोल, दरवाढ, भाववाढीसाठी मतदान कराल तर मग राजा कोण बनणार? मौलवींच्या सांगण्यावरून मुस्लिम मतदान करतात, त्यामुळे तुम्ही हिंदू हितांबाबत बोलणा-यांनाच मतदान करा त्यामुळे आता कालीचरण महाराजांच्या विधानानंतर हिंदू समाज काय भूमिका घेणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कालीचरण महाराजांच्या वक्तव्यावर भाष्य करताना सकल मराठा समाजाच्या चंद्रकांत भराट यांनी म्हटले की, ‘कालीचरण महाराजांच्या महिलांसारख्या पेहरावामुळे हे खरंच महाराज आहेत की नाही हेच कळत नाही. आम्ही छत्रपतींच्या स्वराज्यातील हिंदुत्व मानतो, धर्माधर्मात भेदभाव करणारे हिंदुत्व या महाराजांनी शिकवू नये. मुळातच आम्ही क्षत्रीय आहोत आणि राक्षस क्षत्रीय नव्हते, तर कालीचरण यांचेच पूर्वज राक्षस होते. त्यांनी धर्माची भाषा बोलावी, राजकारणाची भाषा बोलू नये.
ते स्वत:च राक्षस
बुलंद छावा मराठा युवा परिषदेचे प्रदेश सचिव सुरेश वाकडे यांनी म्हटले की, अशा महाराजांचा धंदा झालाय. ते जर हिंदू म्हणून बोलत असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नसावेत. ते स्वत:च राक्षस आहेत. यांच्या बोलण्याकडे सकल मराठा समाज म्हणून आम्ही सपशेल दुर्लक्ष करत आहोत. हे केवळ पैसे कमाऊ महाराज आहेत.