15.2 C
Latur
Wednesday, January 7, 2026
Homeमहाराष्ट्रकाळे कपडे परिधान केल्याच्या कारणावरून कार्यक्रम स्थळी प्रवेश नाकारला

काळे कपडे परिधान केल्याच्या कारणावरून कार्यक्रम स्थळी प्रवेश नाकारला

सातारा : प्रतिनिधी
साता-यात ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभासाठी साता-यात आलेल्या एका युवकाला केवळ काळे कपडे परिधान केल्याच्या कारणावरून कार्यक्रमस्थळी प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा युवक अन्य कोणी नसून युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक प्रदीप कोकरे असल्याचे समोर आले आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या कोकरे यांना उद्घाटनाच्या कार्यक्रमात जाऊ दिले नसल्याने साहित्य क्षेत्रात आणि सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

या घटनेबाबत लेखक प्रदीप कोकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपण काळे कपडे परिधान केल्यामुळे पोलिसांनी कार्यक्रम स्थळी जाण्यास मज्जाव केला. प्रवेश का नाकारला, अशी विचारणा केल्यानंतर पोलिसांनी ‘वरिष्ठांचा आदेश आहे’ असे उत्तर दिले, असंही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. कार्यक्रमादरम्यान उभं राहून कुणी निषेध व्यक्त करू नये, यासाठी काळे कपडे घातलेल्या व्यक्तींना आत सोडू नये, अशा सूचना असल्याचे पोलिसांनी सांगितल्याचा दावा कोकरे यांनी केला आहे.

या प्रकारामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. साहित्य संमेलन हे विचारमंथनाचे, मतभिन्नतेचे आणि मुक्त अभिव्यक्तीचे व्यासपीठ मानले जाते. अशा ठिकाणी कपड्यांच्या रंगावरून प्रवेश नाकारणे योग्य आहे का, असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेषत: पुरस्कारप्राप्त लेखकाला अशा प्रकारे अडवण्यात आले, ही बाब गंभीर असल्याचे मत साहित्यिक वर्तुळातून व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, संमेलनस्थळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्घाटन समारंभादरम्यान कोणताही निषेध, घोषणाबाजी किंवा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात असल्याचे प्रशासनाकडून अनौपचारिकरीत्या सांगितले जात आहे. मात्र, ही खबरदारी अभिव्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर मर्यादा आणणारी ठरते का, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR