30.7 C
Latur
Wednesday, April 23, 2025
Homeमुख्य बातम्याकाश्मिरमध्ये बंद, कोकणात हाय अलर्ट; पुण्यात नाकाबंदी

काश्मिरमध्ये बंद, कोकणात हाय अलर्ट; पुण्यात नाकाबंदी

नवी दिल्ली/मुंबई : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी (२२ एप्रिल) दुपारच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली. या हल्ल्यात २७ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मुंबई, दिल्ली, पुण्यासह कोकण किनारपट्टीवर विशेष सतर्कता जारी करण्यात आली आहे. तसेच देशभरातील प्रमुख शहरांमध्येही हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली. किनारपट्टी भागात येणा-या-जाणा-या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी किनारपट्टीवर अनेक ठिकाणी चेकपोस्ट उभारले आहेत. तसेच संशयित हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील गर्दीच्या किना-यांवर चोवीस तास गस्त ठेवली जात आहे. तसेच पर्यटन स्थळांवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. किनारपट्टी भागातील लँडिंग पॉईंट्सवर विशेष नजर ठेवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ३६ लँडिंग पॉईंट्स आहेत.

मुंबई, पुण्यात हाय अलर्ट : मुंबई, पुण्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलीस विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी सर्व वरिष्ठ निरीक्षक आणि क्षेत्रीय पोलीस उपायुक्तांना (डीसीपी) आपापल्या क्षेत्रांमध्ये अधिक सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषत: गर्दीची ठिकाणे, प्रमुख इमारती आणि संवेदनशील जागांवर सुरक्षा वाढवण्यावर भर दिला जात आहे. पोलिसांनी संशयित व्यक्तींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्याचे आणि वाहनांची कसून तपासणी करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दिल्लीतही अलर्ट जारी : दिल्ली पोलिसांनी पर्यटन स्थळे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जम्मू-कश्मीरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. अनंतनाग शहरात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अनेक भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. अनंतनागमध्ये सध्या संचारबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR