21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रकिती छोट्या मनाची माणसे आहेत

किती छोट्या मनाची माणसे आहेत

आव्हाडांचे अजितदादांवर शरसंधान

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (एनसीपी – एसपी) या दोन पक्षांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. आता पुणे जिल्हा दूध संघातील एका ड्रायव्हरवरून शरद पवार गट आक्रमक झाला आहे. किती छोट्या मनाची माणसे आहेत, असे सांगत एनसीपी – एसपीचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शरसंधान केले आहे.

पुणे जिल्हा दूध संघामध्ये ज्ञानेश्वर आखाडे यांची ड्रायव्हर ग्रेड असतानाही १ एप्रिल २०२४ रोजी त्यांची सुरक्षा रक्षक म्हणून बदली करण्यात आली. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केले आहे. माझ्या कामात यांनी राजकारण आणले आहे. माझी चूक काय तर मी एनसीपी एसपीचे काम करत आहे, म्हणून एवढे गलिच्छ राजकारण सध्याच्या घडीला सुरू आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

एनसीपी एसपीचे काम करण्याचे स्वातंत्र्यही आजघडीला संघातील कर्मचा-याला नाही. प्रत्येक कर्मचारी दबावाखाली काम करत आहे. एखाद्याने फोनमध्ये स्टेटस ठेवले तरी, स्टेटस डिलीट कर नाहीतर तुझी बदली करण्यात येईल, असे त्याला सांगण्यात येते. त्यातूनच आज माझ्यावर कारवाई झाली. या कारवाईच्या भीतीने कोणीही कर्मचारी एक स्टेटस ठेवू शकत नाही. संघातील सर्व कर्मचारी त्यांच्या विरोधात आहेत, परंतु बोलू शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले असून त्यांनी एनसीपी एसपीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना हे ट्वीट टॅग केले आहे. माझ्याकडे व्हीजेएनटी सेलच्या मुळशी तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी असून पुढे मी माझी जबाबदारी अजून ताकतीने पार पाडेन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

ज्ञानेश्वर आखाडे यांचे हे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी रीपोस्ट केले आहे. सुप्रिया सुळे यांचे स्टेटस व्हॉटस्अ‍ॅपला ठेवले म्हणून पुणे जिल्हा दूध संघातील ड्रायव्हरची बदली केली, असे सांगत, किती छोट्या मनाची माणसे आहेत, असा टोला त्यांनी लागवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR