पोंगयांग : वृत्तसंस्था
पश्चिम आशियामध्ये युद्धाची धग सातत्याने वाढत आहे. इराण-लेबनॉन आणि इस्रायल यांच्यात युद्ध पेटले आहे. याच बरोबर पूर्व आशियातही अशांतता वाढत आहे. इस्रायल-हिजबुल्लाह यांच्यात युद्ध पेटलेले असतानाच आता उत्तर कोरियाने दिलेल्या धमकीमुळे १० हजार किलोमीटर दूरवर असलेल्या अमेरिकेचेही टेन्शन वाढले आहे.
हुकूमशहा किम जोंग उनने थेट अमेरिका आणि दक्षिण कोरियाला थेट अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. महत्वाचे म्हणजे, संबंध खराब असल्याने उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील वैरामुळे केव्हाही युद्ध भडकू शकते.
जर उत्तर कोरियाला चिथावणी दिली गेली अथवा हल्ला केला गेला, तर उत्तर कोरिया अण्वस्त्रांचा वापर करून दक्षिण कोरियाला पूर्णपणे नष्ट करेल, अशी धमकी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी दिली आहे. किम जोंग उन यांनी अण्वस्त्रांचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची राजवट संपुष्टात येईल, असा इशारा दक्षिण कोरियाच्या नेत्याने दिला होता. त्याला प्रत्युत्तर देत किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाला हा इशारा दिला आहे.
‘कोरियन सेंट्रल न्यूज एजेन्सी’ (केसीएनए) ने दिलेल्या वृत्तानुसार, हुकूमशहा किम जोंग उन यांनी स्पेशल ऑपरेशन्स फोर्सेसच्या तुकडीला भेट दिली यावेळी ते म्हणाले, आपल्या देशावर दक्षिण कोरिया अथवा त्याचा मित्र असलेल्या अमेरिकेने हल्ला केला, तर आपले लष्कर न डगमगता अण्वस्त्रांसह सर्व प्रकारच्या आक्रमक शस्त्रास्त्रांचा वापर करेल. जर अशी स्थिती आलीच तर, दक्षिण कोरीयाचे अस्तित्व देखील शिल्लक राहणार नाही. खरे तर, दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये अशा प्रकारच्या वक्तव्ये नवीन नाहीत.