लातूर : प्रतिनिधी
शहरातील महात्मा फुले भाजी मंडईत गत दोन अठवड्यापासून भाजीपाल्याची आवक वाढत असल्याने किरकोळ बाजारात भाजीपाल्याच्या दरात घसरण होत आहे. भाव कमी असल्याने सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विशेषत: पालेभाज्यांच्या भावात चांगलीच घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
एरवी कोथंबीरची ३० रुपयांना असलेली जुडी १५ ते २० रुपयांत येत आहेत. त्यासोबतच वांगे, मिरची तसेच बटाटे, शिमला मिरची यांचे भाव २० ते ३० रुपये प्रतिकिलो दरम्यान आहेत. टोमॅटोच्या भावात चांगलीच चढ-उतार होत आहे. १० ते २० रुपये किलो टोमॅटो मिळत आहेत. तर कारला, दोडके, सिमला मिरची आदींची भावे ३० ते ४० रुपये प्रतिकिलोच्या दरात आहे. फुल कोबी, पत्ता कोबी, गाजर, पालक, मेथी आदींचे भावही आटोक्यात आले असल्याचे व्यापारी मिनाझ बागवान यांनी एकमतशी बोलताना सागीतले आहे.
नोव्हेंबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिके खराब झाली होती. इतर फळभाज्यांप्रमाणे पालेभाज्यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला. भाजीपाला लवकर नासत असल्यामुळे शहरातील बाजार समितीत येण्या आधीच काही माल खराब होत होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मेथी आणि कोथ्ािंबीरसह आदी पालेभाज्यांचे भाव वधारले होते. शहरातील कृषी उत्पन्न बाजारात मालाची आवक कमी होत असल्याने भाजीपाल्याला चागला दर मिळाला होता. कोथ्ािंबीर, मेथी, काकडी, मिरची, दोडका आदी पालेभाज्या ४० ते ५० रुपये प्रति किलो दराने विकली जात होती. सध्या थंडीची लाट पसरल्यामुळे भाजीपाला पिकांना पोषक वातावरण तयार झाल्याने, त्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
शहरातील महात्मा फुले बाजार समितीत ग्रामिन भागासह धाराशिव, उमरगा आदी भगातून भाजीपाला दाखल होत असतो. शहरातील बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून आवक वाढल्यामुळे किरकोळ बाजारात पालेभाज्यांच्या दरात घसरन झाल्याचे चित्र दिसून येत आहे. महात्मा फुले बाजार समितीत महिन्यांपूर्वी पालेभाज्यांने तब्बल ६० ते ८० रुपये प्रतिकिलो असा उच्चांक गाठला होता. मात्र गेल्या आठ दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात घसरण होत असल्याचे व्यापारी वर्गानी सागीतले आहे. किरकोळ बाजारात मात्र गवार, दोडका, शेवगा, अदरक यांचे दर स्थिर असल्याचे व्यापा-यांनी वर्गानी सागीतले आहे.