किरकोळ दर ३.६१ टक्क्यांवर, व्याजदरात होणार कपात?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भाज्या आणि प्रथिनेयुक्त वस्तूंच्या किमती घटल्यामुळे सरलेल्या फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई दर ३.६१ टक्क्यांपर्यंत नरमला आहे. जानेवारी महिन्यात हाच महागाई दर ४.३१ टक्क्यांवर होता. आता हा महागाई दर गेल्या ७ महिन्यांच्या निचांकी पातळीवर गेला आहे. जुलै २०२४ मध्ये महागाई दर ३.६० टक्के राहिला होता. दरम्यान, महागाई दर ४ टक्क्यांच्या खाली आल्याने पुन्हा एकदा रेपो रेट कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर सरलेल्या फेब्रुवारीत सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर दिलासादायी घसरण झाली आहे. या आधी जानेवारीत तो ४.२६ टक्के, तर गेल्या वर्षी फेब्रुवारी २०२४ मध्ये ५.०९ टक्के पातळीवर होता. फेब्रुवारी २०२५ मध्ये वार्षिक सरासरी चलनवाढीचा दर ३.७५ टक्क्यांवर गडगडला आहे.
जानेवारी २०२५ च्या तुलनेत फेब्रुवारी २०२५ मध्ये खाद्यान्न महागाईत २२२ आधारबिंदूंची तीव्र घट दिसून आली आहे. फेब्रुवारीमधील खाद्यान्न महागाईची पातळी ही मे २०२३ नंतरची सर्वात कमी पातळीवर आहे. फेब्रुवारीत प्रमुख चलनवाढ (कोअर इन्फ्लेशन) आणि अन्नधान्याच्या महागाईत लक्षणीय घट झाल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने म्हटले आहे.
भाज्या तसेच प्रथिनेयुक्त आहार असलेल्या अंडी, मांस आणि मासे, डाळी आणि उत्पादने, दूध आणि उत्पादनांच्या महागाईत घट झाल्यामुळे महागाईत तीव्र घसरण झाली आहे. किरकोळ महागाईदर ४ टक्क्यांच्या पातळीवर मर्यादित ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्नशील आहे.
पतधोरणाच्या आढावा
बैठकीत निर्णय होणार?
गेल्या महिन्यात महागाईच्या आघाडीवरील चिंता कमी झाल्या कारणाने तिने अल्पकालीन कर्ज दर (रेपो) २५ आधारबिंदूंनी कमी केला आहे. त्यामुळे पुढील महिन्यात ९ एप्रिल रोजी पुढील द्वैमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीत यासंंबंधी पवित्रा काय राहिल का, याबाबत औत्सुक्य आहे.