नागपूर : प्रतिनिधी
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. महायुतीसह महाविकास आघाडीमधील नेते जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान, महायुतीमध्ये अंतर्गत वादविवाद आणि धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा आहेत. अनेकांनी याबाबत वक्तव्यं केली आहेत, सध्या भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी नाकारल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या नाराज असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून किरीट सोमय्या यांची संपर्कप्रमुखपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. मात्र पक्षाने दिलेला हा आदेश आणि जबाबदारी किरीट सोमय्या यांना आवडली नाही. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही जबाबदारी नाकारली. तसेच आपली नाराजी उघड केली. यामुळे आता किरीट सोमय्या पक्षामध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावरून विरोधकांनी देखील टीका केली आहे. हे.
पक्षाचे नेतृत्व हे कोणाला विचारून जबाबदारी देत नसते
आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली , किरीट सोमय्या हे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. मात्र, पक्षाचे नेतृत्व हे कोणाला विचारून एखादे पद किंवा जबाबदारी देत नाही, याबाबत तसा नियमही आहे. आता कोणाला आमदारकी द्यायची असेल तर पक्ष विचारत नाही. किंवा एखादी जबाबदारी द्यायची असेल तर विचारून देत नाही.
किरीट सोमय्या यांची पोस्ट
पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुखपदी नियुक्ती जाहीर केली. यावर नाराज होत सोशल मीडियावर सोमय्या यांनी लिहिले की, पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीच्या सदस्यपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मी महाराष्ट्र भाजपाचे आभार मानतो. मात्र मी हे पद स्वीकारण्यास असमर्थ आहे, त्याबद्दल खेद व्यक्त करतो. तसेच किरीट सोमय्या यांनी रावसाहेब दानवे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्कप्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, हे मला अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी, असे स्पष्ट मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले.