32.3 C
Latur
Monday, March 16, 2026
Homeमहाराष्ट्रकीर्तनकाराचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ

कीर्तनकाराचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ

अहिल्यानगर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळीपूर गावात वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ याने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पारनेरसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ हा स्वत:ला महाराज म्हणवून घेतो. ३८ वर्षांच्या या नराधमाने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार केले. अल्पवयीन मुलीला धाक दाखवून एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ याने युवतीवर वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीला गरम लोखंडी पकडने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ हा पाच वर्षांपासून अल्पवयीन पीडितेवर अत्याचार करत होता. मुलीवरील अत्याचाराची तक्रार तिच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर तातडीने कारवाई करत अण्णासाहेब गुंजाळ या नराधमाला रविवारी पहाटे चार वाजता बेड्या ठोकल्या. त्याच्याविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला रविवारी सुटीच्या कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने नराधम अण्णासाहेब गुंजाळला २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पाच वर्षांपासून अत्याचार
पीडितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी इयत्ता आठवीत असल्यापासून अण्णासाहेब गुंजाळची तिच्यावर वाकडी नजर होती. आरोपी यशवंत थोरात उर्फ अण्णा गुंजाळ हा पीडितेच्या शेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबांचे कौटुंबिक संबंध होते. पीडितेचा भाऊ आरोपीच्या वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहे. याचाच फायदा घेऊन आरोपीने २०२१पासून पीडितेवर वाईट नजर ठेवली होती. मुलगी घरी एकटी असताना किंवा आरोपीच्या घरी कोणी नसताना त्याने वारंवार तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.

विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी
पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ‘मी दोन हाफ मर्डर केलेले आहेत, जर कोणाला काही सांगितले तर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला मारून टाकीन’, अशी धमकी तो देत होता. कुटुंबावर कोणतेही संकट येऊ नये, कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी पीडितेने या नराधमाचा छळ मुकाट्याने सहन केला. १० मार्च २०२६ रोजी शिगेला पोहोचला. आरोपीने पीडितेला फोन करून त्याच्या घरी बोलावले. आरोपीने तिला  बांबूने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, नराधम आरोपीने लोखंडी सांडशी गॅसवर गरम करून पीडितेला चटके दिले. या अमानुष कृत्यानंतरही त्याने तिच्यावर अत्याचार केला. पारनेर पोलिसांनी याप्रकरणी यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णा गुंजाळ विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.