नागपूर : प्रतिनिधी
‘चार तास, चाळीस मिनिटे किंवा चार मिनिटे भेट झाली ना, कशासाठी गेले होते, एकमेकांची पप्पी घेण्यासाठी गेले होते का? कुछ तो गडबड है ’, असे म्हणत वडेट्टीवार यांनी संशय व्यक्त केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
आधी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ‘आका’चा ‘आका’ म्हणून टीका करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी त्यांची भेट घेतल्यापासून राजकीय वातावरण तापले आहे. धस आणि मुंडेंमध्ये चार तास बैठक झाली, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, धस यांनी सारवासारव करत अवघी २० ते ३० मिनिटे ही भेट झाल्याचे म्हटले आहे. यावरून काँग्रेसचे नेते, विजय वडेट्टीवार यांनी धस यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, चार तास, चाळीस मिनिटे किंवा चार मिनिटे भेट झाली ना कशासाठी गेले होते, एकमेकांची पप्पी घेण्यासाठी गेले होते का? एवढे काय नव्हते, डोळ्याचे ऑपरेशन झाले होते, नॉर्मल ऑपरेशन असते. खूप चिंताजनक परिस्थिती होती का? भेटायला जायला.. मंत्रिमंडळातील कुणीच भेटायला गेले नाही. कुछ तो गडबड है.. काहीतरी साध्य करण्यासाठी धस गेले असतील.
धस स्वत:च्या अध्यक्षांच्या विधानावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. तर धस नेमके कुणाच्या इशा-यावर हिंमत करत आहेत, हे बावनकुळेंनी शोधून काढावे, असे आव्हान वडेट्टीवार यांनी दिले आहे.