बीड : प्रतिनिधी
कुटुंब म्हणून आम्ही एकच होतो नियतीने आम्हाला राजकारणात देखील एकत्र आणले आहे. महायुतीमुळे आम्ही बहीण भाऊ राजकीय मंचावर देखील आता एकत्र आहोत. महाविकास आघाडीकडून मला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु त्यांना अद्याप उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे अभिमन्यू कोणाचा होतोय हे तुम्हीच ठरवा असे देखील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हणत अजित पवार गटाकडून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे गोपीनाथ गड येथे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. धनंजय मुंड यांनी गुरुवारी २४ ऑक्टोबर रोजी पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.
पुढे बोलताना मुंडे म्हणाले कोणतीही निवडणूक असली तरी मी ती सहज घेत नाही. लढाई ही लढाई असते या लढाईमध्ये आपण संपूर्णपणे झोकुन देऊन विजय प्राप्त करायचा असतो. त्यामुळे मी ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे, असा विश्वास मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभेमध्ये आम्ही बहिण -भाऊ एकत्र होतो. पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघातून ७५ हजाराची लीड मिळाली म्हणून मी ही निवडणूक सहजपणे घेणार नाही. विधानसभेत देखील पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
पंकजा मुंडेंनी दिल्या शुभेच्छा
अर्ज भरण्याआधी धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या घरी पोहचले आहेत. येथे पंकजा यांनी धनंजय मुंडेंचे औक्षण केले आहे. तसेच विजयी होण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.