कुडाळ : कुडाळमध्ये महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला असून, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे ५ नगरसेवक व काँग्रेसचे २ नगरसेवक अशा एकूण ७ नगरसेवकांनी भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
बुधवारी (ता. १२ फेब्रुवारी) ओरोस येथे कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मविआच्या नगरसेवकांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. ज्यामुळे आता कुडाळ नगरपंचायतीत मविआतील शिवसेना ठाकरे गटाचा केवळ एकच नगरसेवक शिल्लक राहिला आहे. परंतु, यामुळे कुडाळमध्ये मविआला मोठे खिंडार पडले आहे.
ओरोस येथे भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका सई काळप, ज्योती जळवी, श्रेया गवंडे व काँग्रेसच्या नगरसेविका आफ्रिन करोल, अक्षता खटावकर या ७ नगरसेवकांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. तर ठाकरे गटाचे एक नगरसेवक मंदार शिरसाट हे मात्र उध्दव ठाकरेंसोबतच राहिले आहेत.
कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचीच गेली पावणे तीन वर्षे सत्ता होती. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी अचानक कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सत्ता बदल झाला. त्यावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नगरसेविका श्रुती राकेश वर्दम यांनी भाजपाच्या नगरसेविका प्राजक्ता बांदेकर-शिरवळकर यांना साथ दिल्याने प्राजक्ता बांदेकर या नगराध्यक्षपदावर विराजमान झाल्या होत्या. त्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता.
आगामी निवडणुकीमध्ये महायुती सोडून अन्य कोणीही नावालाही असता कामा नये असे काम करा, या जिल्ह्यात शतप्रतिशत भाजपा निर्माण करा, असे आवाहन यावेळी आमदार नितेश राणेंनी केले. तर, सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. आपल्या सर्वांच्या पक्ष प्रवेशाने तो अजून मजबूत झाला आहे. देशभरात १३ कोटी व महाराष्ट्रात १ कोटी ५ लाखांपेक्षा जास्त सदस्य नोंदणी असलेला आपला पक्ष आहे. भाजपामध्ये आतापासून सदस्य म्हणून आपल्याला हातभार लावायचा आहे. या संघटनपर्वामध्ये भाजपाचा बालेकिल्ला अधिक मजबूत करायचा आहे. त्यामुळे पक्षासाठी झोकून देऊन काम करा, तर, तुम्हाला निधीची कमी पडू देणार नाही, असे यावेळी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.