मुंबई : प्रतिनिधी
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या विडंबन काव्याने सरकार बिथरले असून आता कामराचा कार्यक्रम पाहिलेल्या प्रेक्षकांनाही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. प्रेक्षकांना नोटीस पाठवणे हा राज्यात पोलीस स्टेट आणण्याचा प्रयत्न आहे असे स्पष्ट दिसते, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
दरम्यान, काँग्रेस सरकार असताना महाराष्ट्रात पोलिसांचा धाक होता, मुंबई पोलिसांची तर स्कॉटलंड यार्डशी तुलना केली जात असे. पण देवेंद्र फडणवीसांकडे गृहखात्याचा कारभार गेल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ पुढे म्हणाले की, एका विनोदी कलाकाराने राजकीय नेत्यावर काही विनोद केला तर त्याचा मोठ्या मनाने स्विकार करायला हवा. त्याकडे एक विनोद म्हणूनच पहायला हवा.