जबाब नोंदविण्यासाठी अटकेची गरज नाही : मुंबई हायकोर्ट
मुंबई : प्रतिनिधी
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराचा जबाब नोंदवण्यासाठी त्याच्या अटकेची गरज नाही. तुम्ही त्याचा जबाब तामिळनाडूत जाऊनही नोंदवू शकता, अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने पोलिसांना फटकारले. मुंबई हायकोर्टाने थेट मुंबई पोलिसांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करीत फटकारल्यामुळे एका अर्थाने कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक गाणे सादर केले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कुणाल कामराविरोधात तक्रार दाखल केली होती. आता ही तक्रार रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी न्यायाधीशांनी पोलिसांना फटकारले.
कुणाल कामरा यांच्या जिवाला धोका असताना चौकशीला त्याला स्वत: उपस्थित राहण्यासाठी का सांगत आहात, त्यांच्या जिवाला धोका आहे तर मग आपण त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणार का, कुणाल कामराचे स्टेटमेंट घेण्याची गरज आहे का, असा सवाल कोर्टाकडून करÞण्यात आला. इतकेच नाही तर कुणाल कामराचा जबाब घ्यायचाच आहे तर मुंबई पोलिस तामिळनाडूमध्ये जाऊन जबाब नोंदवू शकतात, असे म्हणत कोर्टाने पोलिसांनाच फैलावर घेतले. त्यामुळे कुणाल कामराला तूर्त तरी दिलासा मिळाला आहे.