सांगली : प्रतिनिधी
प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून केलेल्या एका कवितेने वाद उफाळला. विधानसभेतही हा मुद्दा चांगलाच गाजला. यावरून विधानसभा आणि विधान परिषदेत शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी एकच गोंधळ घातला होता. आता शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी कुणाल कामरावरून विधानसभेत गोंधळ घालणा-यांना फटकारले आहे. पण, शिंदे गट की भाजप त्यांचा रोख कुणाकडे होता? कळले नाही.
कामराच्या विषयावरून विधानसभेत जो गदारोळ, धुडगूस, नादानपणा चालवलाय ते लोकशाहीला शोभणारा नाही, असे म्हणत संभाजी भिडे यांनी आमदारांना सुनावले आहे. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. संभाजी भिडे म्हणाले, कामरा नावाच्या पद्धतीची हॉटेलं चालवणे म्हणजे डान्सबारची सावत्र भावंडे आहेत. कामराच्या विषयावरून विधानसभेत जो गदारोळ, धुडगूस, नादानपणा चालवलाय ते लोकशाहीला शोभणारे नाही. मी कुणाचे नाव घेत नाही, पण ज्यांनी ज्यांनी विधानसभेत नीचपणा केलाय ते देशद्रोहीच आहेत.
शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते
छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते. त्यांनी व छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला. प्राध्यापक, शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत. छत्रपती शहाजी राजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे, या मताचे होते, मात्र त्यांना यश आले नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी तो विचार पुढे आणला. राजकीय पक्ष, गट, संघटना मात्र स्वार्थासाठी त्यांचा वापर करून घेत आहेत, असे संभाजी भिडे यांनी म्हटले.
वाघ्याचा पुतळा आवश्यक
रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत छत्रपती संभाजीराजे भोसले जे बोलत आहेत ते चूक आहे. वाघ्याची जी कथा सांगितली जाते ती सत्य आहे. आज माणसे जेवढी एकनिष्ठ नसतात, तेवढी त्याकाळी कुत्री होती, हे दाखवण्यासाठी हा कुत्र्याचा पुतळा आवश्यक आहे, असे संभाजी भिडे यांनी सांगितले.