27.4 C
Latur
Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रकुणाल कामराच्या स्टँडअपमुळे सर्वत्र खळबळ

कुणाल कामराच्या स्टँडअपमुळे सर्वत्र खळबळ

एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याने मोठा वाद

मुंबई : प्रतिनिधी
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने एका कार्यक्रमादरम्यान अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या गाण्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप पसरला असून, मुंबईतील खार परिसरातील युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये तोडफोड करण्यात आली आहे. हेच ठिकाण कुणाल कामराचा कॉमेडी शो पार पडला होता.

या व्हिडिओमध्ये ‘गद्दार’ असा उल्लेख करत शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली होती. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध करत संताप व्यक्त केला. त्यानंतर खार परिसरात जोरदार आंदोलन आणि तोडफोड झाली.

या संपूर्ण प्रकारामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, हास्यविनोद आणि अभिव्यक्ती स्वातंर्त्य यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर याबाबत तीव्र चर्चा सुरू असून, काही जण कामराच्या समर्थनार्थ तर काहीजण त्याच्या विरोधात मत व्यक्त करत आहेत.

खारघर येथील सेटची तोडफोड
हा व्हिडिओ समोर आल्यावर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी जिथे कुणाल कामराने जिथे स्टँड अप कॉमेडी केली, ते खारघर येथील सेटची तोडफोड केली. याप्रकरणी शिंदे गटातील ११जणांना अटक केली आहे. तसेच, कुणाल कामरा याच्यावर देखील शिंदे गटाकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल
या घटनेनंतर अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि खार पोलीस स्टेशन येथे कुणाल कामराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर राजकीय नेत्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे, धार्मिक आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाद वाढल्यानंतर कुणाल कामरा याने मुंबई सोडली असून तो पाँडिचेरीला गेला असल्याचं समोर आलं आहे.

काही पैशांसाठी राजकीय टीका : नरेश म्हस्के
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी कामरावर कठोर शब्दांत टीका केली. कुणाल कामरासारखे स्टँडअप कॉमेडियन काही पैशांसाठी राजकीय टीका करतात. आता ठाकरे गट एवढ्या खालच्या पातळीवर गेला आहे की त्यांना भाड्याचे कॉमेडियन वापरावे लागत आहेत, असे म्हस्के म्हणाले. त्याचबरोबर, ‘कामराला महाराष्ट्रात फिरू देणार नाही,असा थेट इशाराही त्यांनी दिला.

राऊत यांच्याकडून कुणाल कामराची पाठराख
दुसरीकडे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्याकडून कुणाल कामराची पाठराखण करण्यात आली आहे. ‘कुणाल कामरा दाढीवाल्याबद्दल बोलला, तर दाढ्या काढा,’ असा खोचक सल्ला संजय राऊत यांच्याकडून देण्यात आला आहे. पण, कुणाल कामराने नक्की काय कविता केली? नेमका वाद कशाने पेटला, त्याबद्दल जाणून घेऊया.

कुणाल कामराचे गाणे
कुणाल कामराने एकनाथ शिंदेंना उद्देशून आपल्या स्टँड अपमध्ये गाणे म्हटले आहे. ‘दिल तो पागल हैं ’, चित्रपटातील, ‘भोली सी सूरत, आखों, मैं मस्ती..’ गाण्यातील लिरिक्स घेऊन एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामराने गाणे म्हटले आहे.
ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, आँखो पे चष्मा, हाये
एक झलक दिखलाये, कभी गुवाहाटी मे छुप जाये,
मेरी नजर से तुम देखो, तो गद्दार नजर वो आये
ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, आँखो पे चष्मा, हायेङ्घ
मंत्री नहीं वो दलबदलू है और कहा क्या जाये?
जिस थाली में खाये, उसमेही छेद कर जाये
मंत्रालय से ज्यादा, फडणवीस के गोदी में मिल जाए
तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहे
ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, आँखो पे चष्मा, हाये
यानंतर कुणाल कामरा म्हणाला, ‘‘हे यांचे राजकारण आहे. हे घराणेशाहीला संपवणार होते. पण, यांनी कुणाच्या तरी वडिलांना चोरले. यावर काय बोलणार? उद्या मी सचिन तेंडुलकर यांच्या मुलाला भेटून लंचचे निमंत्रण देईन. तिथे मी सचिन तेंडुलकर यांची प्रशंसा करेल आणि नंतर म्हणेन हे, भाऊ आजपासून हे माझे वडील आहेत. असे कसे चालेल?

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR