मुंबई : कुर्ला येथील बेस्ट बस अपघातामध्ये आतापर्यंत ७ जणांनी आपला जीव गमावला आहे. या अपघातामध्ये ४९ जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर सायन आणि भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती अतिशय चिंतानजक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते. या अपघात प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त करत मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये काल (सोमवारी ९ डिसेंबर) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने शिरलेल्या इलेक्ट्रिक बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. या अपघातामध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ५० जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये कैद झाली आहे.
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचा मृत्यू झाला, त्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची पोस्ट
पोस्टमध्ये पवार यांनी, ‘कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात एस. जी. बर्वे रोड येथे भरधाव बेस्ट बसने अनेक लोकांना चिरडल्याची तसेच या अपघातात काहींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अतिशय दु:खद आहे. मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सर्वांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, दोषी आढळणा-यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल’, असे म्हटले आहे.
अंजली दमानियांनी उपस्थित केला सवाल
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेवर सवाल उपस्थित करत, ‘नि:शब्द ! दोष कुणा कुणाला द्यायचा? पूर्ण सिस्टम सडलेली आहे’, अशी पोस्ट शेअर केली आहे.
बसचालकाला अटक
अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल ६० प्रवासी प्रवास करत होते. बसचालक संजय मोरे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या अपघातानंतर जमावाने बसचालकाला बेदम मारहाण केल्याचे देखील व्हीडीओद्वारे
समोर आले आहे.