लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात रब्बीचा हंगाम तोंडावर असाताना अजून कृषि विभागाकडून कसलीच तयारी केली नसल्याचे समोर आले आहे. विभाग प्रमुखाकडेही जिल्हयात कोणत्या पिकाची किती पेरणी होणार याची माहिती नसल्याने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचा कारभार मोघम स्वरूपात सुरू आहे. जिल्हयात रब्बी पेरणीला सुरूवातही झाली आहे. मात्र कृषि विभागाकडे आजून नियोजनच दिसून येत नाही.
यावर्षी लातूर जिल्हयात रब्बी हगामासाठी पोषक वातावरण आहे. जिल्हयात सरासरी ७९१.६० मिली मिटर पाऊस पडतो. आज पर्यंत ८३७.२ मिली मिटर पावसाची नोंद झाली असून यावर्षी सरासरीच्या अधिक पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी मुबलक प्रमाणात पाणीसाठा तयार झाल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्हयात मुग व उडदाची काढणी जवळपास एक महिण्यापूर्वीच झाली आहे. तर सोयाबीनची काढणी जवळपास संपत आल्याने शेतकरी रब्बी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. ज्या ठिकाणी हालक्या स्वरूपाच्या जमिनी आहेत. तेथे शेतक-यांनी पेरणी करण्यास सुरूवात केली आहे.
रब्बी पेरणीच्या संदर्भाने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने अद्याप प्रस्तावित किती क्षेत्रावर पेरा होणार आहे. कोणत्या पिकाचे किती क्षेत्र असणार या संदर्भाने कोणतीच तयारी केली नसल्याचे समोर आले. तसेच पिकांच्या नियोजनाची आकडवारी लवकरच देऊ अशी मोघमी माहिती कृषि विभागाकडून देण्यात आली.