लातूर : प्रतिनिधी
कृषि सहाय्यकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करत मागण्यांचे निवेदन सादर केले. महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात आंदोलन पुकारले आहे. कृषि सेवक कालावधी रद्द करुन कृषि सेवकांना नियमित कृषि सहाय्यक नियुक्ती देण्यात यावी. कृषि सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषि अधिकारी करणे. कृषि विभागातील संपूर्ण कामकाज डिजीटल स्वरुपात होत असतानांही कृषि सहाय्यकांना लॅपटॉप दिला जात नाही.
कृषि सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषि मदतनीस देणेबाबत. निविष्ठा वाटपासंदर्भात वारंवार निवेदन देऊन सुध्दा त्यामध्ये सुसत्रता येत नसुन कृषि सहाय्यकांना वाहतुक भाड्यापोटी आर्थीक भार सहन करावा लागत आहे. तरी मार्गदर्शक सूचनेमध्ये विविध योजनेत कृषि सहाय्यक यांना वाहतुक भाड्याची तरतुद करावी किंवा निविष्ठा वाटप परमीटद्वारे करावे अन्यथा खरीप हंगाम २०२५ मधील निविष्ठा वाटपावर संघटनेचा बहिष्कार असेल. कृषि विभागाच्या आकृतीबंधास तात्काळ मंजुरी दयावी व त्यामध्ये कृषि पर्यवेक्षक यांचे पदे वाढवून कृषि सहाय्यकांच्या पदोन्नतीमधील कुंटितावस्था दुर करावी व महसुल विभागाप्रमाणे आकृतीबंध करावा, कृषि सहाय्यक कृषि पर्यवेक्षक यांचे प्रमाणे ४:१ प्रमाणे करावे. पोकरा योजनेमध्ये समुह सहाय्यकांची पदे पूर्वीप्रमाणे भरण्यात यावीत.
रोहयोच्या योजने अंतर्गत लक्षांक देताना क्षेत्रीय स्तरावरील आडचणीचा विचार करून लक्षांक देण्यात यावे. नैसर्गीक आपत्तीच्या पंचनामे करणे व तदनंतर करावयाच्या कामाबाबत महसुल, ग्रामविकास व कृषि विभागाच्या जबाबदा-याबाबत योग्य न्यायसंगत कार्यपध्दती तयार करावी. कृषि सहाय्यक संवर्गाच्या आस्थापना विषयक अडचणींची सोडवणुक करण्यात यावी, या प्रलंबित मागण्यांची तात्काळ सोडवणुक करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन केले.या आंदोलनात जिल्हाध्यक्ष ओमकार माने, सचिव शरद धनेगावे, उपाध्यक्ष संतोष तिवारी, किरण सोमवंशी, दिलीप कबाडे, भालचंद्र गुजिटे, नवनाथ येचेवाड, विनायक बारबोले, विष्णू कलमे आदी सहभागी झाले होते.