पुणे : प्रतिनिधी
संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने सातत्याने त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत होता. ‘या कुटुंबाला न्याय द्या!’ – जितेंद्र आव्हाड आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, ‘‘मी आधीच्या भाषणांमध्ये हे सर्व सांगितले होते. जेव्हा संतोष देशमुख अंतिम घटका मोजत होते, तेव्हा त्यांच्यावर नराधम, जल्लाद लघुशंका करत होते. पण त्यावेळी लोकांनी आमची टिंगल केली.’’ तसेच, ‘‘राज्यात माणसाच्या अंगात इतका क्रूरपणा कुठून आला? आपल्याकडे बहीण, बाप, भाऊ, मुलं आहेत. राज्यातील जनतेलाही या घटनेने हादरवून टाकले आहे.’’
आव्हाड यांनी सरकारवर थेट आरोप करत म्हटले की, ‘‘जेव्हा गुन्हे केल्यानंतर आरोपींना राजकीय पाठबळ मिळते, तेव्हा असे क्रूर प्रकार घडतात. जर यांना शिक्षा झाली नाही, तर पुढे आणखी असे प्रकार घडतील.’’ तसेच, संतोष देशमुख यांचे हे फोटो जेव्हा त्यांची मुलं बघतील, त्यांना काय वाटेल? असा संतप्त सवालही त्यांनी केला.
आव्हाड यांनी पुढे जाऊन अन्य प्रकरणांवरही भाष्य करत, ‘‘महादेव मुंडे, किशोर फड, बापू अंधारे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळायला हवा. तसेच, कृष्णा आंधळे हा जिवंत नाही, त्याची हत्या झाली आहे,’’ असे मोठे विधान केले.
राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल आहे. तसेच, न्यायालयीन चौकशी प्रस्तावित आहे. माझी प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांनी उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे.’’