चिनो हिल्स : वृत्तसंस्था
अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील चिनो हिल्स येथील बीएपीएस हिंदू मंदिरात तोडफोडीची घटना समोर आली आहे. यासोबतच मंदिरावर आक्षेपार्ह संदेश लिहिले होते. बीएपीएसच्या सोशल मीडियावरुन ही माहिती शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी असेही अधोरेखित केले की, ते कधीही द्वेषाला मूळ धरू देणार नाहीत आणि शांती आणि करुणा कायम राहील, दरम्यान आता या तोडफोडीच्या घटनेवरुन भारताने निषेध व्यक्त केला आहे.
भारताने या घटनेचा निषेध व्यक्त केला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, कॅलिफोर्नियातील चिनो हिल्स येथील एका हिंदू मंदिराच्या तोडफोडीचे वृत्त आम्ही पाहिले आहे. आम्ही अशा घृणास्पद कृत्यांचा तीव्र निषेध करतो.
स्थानिक अधिका-यांना याबाबत जे जबाबदार असतील त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली असून प्रार्थना स्थळांवर सुरक्षा पुरवण्याची मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षीही मंदिर तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या, २५ सप्टेंबरच्या रात्री कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो येथील बीएपीएस स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. न्यू यॉर्कमधील बीएपीएस मंदिरात अशाच प्रकारची घटना घडल्यानंतर १० दिवसांपेक्षा कमी वेळात ही घटना घडली.