राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत मदत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी वित्त वर्ष २०२५-२६ साठी महाराष्ट्र राज्याला राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत केंद्राच्या हिस्स्याच्या दुस-या हप्त्यात एकूण १,५६६.४० कोटी रुपये निधी मंजूर केला. यंदाच्या मान्सून काळात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बाधित झाले आहेत. या नागरिकांना तात्काळ मदत आणि पुनर्वसनासाठी हा निधी मंजूर करण्यात आला. या निधीमुळे नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार नैसर्गिक आपत्तीच्या काळात राज्य शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. गृह मंत्रालयाच्या शिफारसीनुसार हा निधी मंजूर करण्यात आला. चालू वर्षात केंद्र सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत २७ राज्यांना १३,६०३.२० कोटी रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत १५ राज्यांना २,१८९.२८ कोटी रुपये वितरित केले आहेत. याशिवाय राज्य आपत्ती न्यूनीकरण निधीमधून २१ राज्यांना ४,५७१.३० कोटी रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती न्यूनीकरण निधी मधून ९ राज्यांना ३७२.०९ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले.
पूर, भूस्खलन, ढगफुटी
प्रभावित राज्यांना मदत
पूर, भूस्खलन आणि ढगफुटी यांसारख्या आपत्तींमुळे प्रभावित राज्यांना सर्वतोपरी सहाय्य पुरवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. यंदाच्या मान्सून काळात महाराष्ट्रासह देशभरातील ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बचाव आणि मदत कार्यासाठी एनडीआरएफच्या विक्रमी १९९ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.