मुंबई/ नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केएफसी आणि पिझ्झा हटची ऑपरेटर सफायर फूड्स आता देवयानी इंटरनॅशनलमध्ये विलीन होईल. देवयानी इंटरनॅशनल भारतात आधीपासून अनेक मोठे क्विक सर्व्हिस रेस्टॉरंटचे ब्रँड्स चालवते. या डीलअंतर्गत सफायरच्या प्रत्येक १०० शेअर्सवर देवयानी १७७ शेअर्स जारी करेल. विलीनीकरणानंतर तयार होणा-या संयुक्त कंपनीला दुस-या पूर्ण वर्षापासून वर्षाला २१०-२२५ कोटी रुपयांपर्यंतची सिनर्जी मिळण्याची अपेक्षा आहे.
वास्तविक, भारतातील फास्ट-फूड क्षेत्र सध्या दबावाखाली आहे. महागाई आणि वाढत्या राहणीमानाच्या खर्चामुळे लोक बाहेर खाणं आणि ऑनलाइन फूड ऑर्डरवर कपात करत आहेत. याचा थेट परिणाम रेस्टॉरंट्सची विक्री आणि नफ्यावर झाला आहे. सफायर आणि देवयानी या दोन्ही कंपन्यांनी सप्टेंबर तिमाहीत वाढता खर्च आणि तोटा नोंदवला आहे. अशा परिस्थितीत खर्च कमी करण्यासाठी, व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि नफा सुधारण्यासाठी हे विलीनीकरण महत्त्वाचे मानले जात आहे.
यामुळे मॅकडोनाल्ड्स आणि डोमिनोजवरील स्पर्धेचा दबाव वाढणे निश्चित आहे. या मेगा मर्जरमुळे केवळ क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट क्षेत्रातील समीकरणच बदलणार नाही, तर मॅकडोनाल्ड्स आणि डोमिनोज सारख्या दिग्गज कंपन्यांच्या अडचणीही वाढू शकतात.
परंतु, ही डील लगेच पूर्ण होणार नाही. यासाठी स्टॉक एक्स्चेंज, सीसीआय, एनसीएलटी, भागधारक आणि कर्जदात्यांची मंजुरी आवश्यक आहे. या प्रक्रियेला साधारणपणे १२ ते १५ महिन्यांचा वेळ लागू शकतो. मंजुरी मिळाल्यानंतरच हे विलीनीकरण प्रभावी होईल.
















