ऐन निवडणुकीत ७ आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आठवड्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. यादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शुक्रवारी आम आदमी पक्षाच्या ७ आमदारांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या सातही आमदारांना आपने तिकीट दिलेले नाही.
पालम येथील आमदार भावना गौर यांनी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून आपण पक्षावरील विश्वास गमावल्याने पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे. माझा तुमच्यावरील आणि पक्षावरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे राजीनामा स्वीकारा, असे भावना गौर यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे. कस्तुरबानगर येथील आमदार मदन लाल यांनीदेखील हीच भावना व्यक्त केली. तसेच त्रिलोकपुरीचे आमदार रोहित मेहरौलिया, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी, मेहरौलीचे आमदार नरेश यादव यांनीही आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आदर्शनगरचे आमदार पवन शर्मा आणि बिजवासनचे आमदार बीएस जून यांनीही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या सर्व आमदारांना आपने या निवडणुकीत उमेदवारी दिलेली नाही.
उमेदवारी न दिल्याने नाराजी?
आम आदमी पक्षाने आदर्शनगर येथून मुकेश गोयल यांना संधी दिली तर प्रविण कुमार यांना जनकपुरी, सुरेंद्र भारद्वाज यांना बिजनवास, जोगींदर सोलंकी यांना पालम, रमेश पेहलवान यांना कस्तुरबानगर, नरेश यादव यांना मेहरौली आणि अनजना पर्चा यांना त्रिलोकपुरी येथून तिकीट देण्यात आले आहे.