वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे माजी अॅटर्नी जनरल रॉबर्ट एफ. केनेडी आणि नागरिक हक्क चळवळीचे नेते मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या हत्यांशी संबंधित फाईल्स काही दिवसांत प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांनी दिली.
व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या कॅबिनेट बैठकीत गबार्ड बोलत होत्या. त्यांनी सांगितले की सध्या रॉबर्ट एफ. केनेडी आणि किंग यांच्या फाइल्स स्कॅन केल्या जात आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जानेवारी महिन्यात एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली होती, ज्यामध्ये केनेडी आणि किंग यांच्या हत्येसंबंधीच्या फाईल्स तसेच राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येशी संबंधित दस्तऐवजांना अनसेंसर्ड स्वरूपात प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले होते.
काही दशकांपासून ही कागदपत्रे बॉक्समध्ये आणि संग्रहात पडून होती. ही कागदपत्रे कधीच स्कॅन किंवा पाहिली गेलेली नाहीत. आता या फाईल्स काही दिवसांत प्रसिद्ध करण्यासाठी तयार असतील. नॅशनल अर्काइव्ह्जने गेल्या काही दशकांत केनेडी यांच्या हत्येशी संबंधित लाखो पानांची कागदपत्रे प्रसिद्ध केली आहेत, परंतु काही हजार दस्तऐवज सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी आणि फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन यांच्या विनंतीवरून रोखून ठेवले गेले होते.
मार्च महिन्यात, नॅशनल अर्काइव्ह्जने राष्ट्राध्यक्ष केनेडी यांच्या नोव्हेंबर १९६३ मध्ये झालेल्या हत्येशी संबंधित शेवटचा दस्तऐवजांचा संच प्रसिद्ध केला होता. ४६ वर्षीय जॉन एफ. केनेडी राष्ट्राध्यक्ष असताना त्यांची हत्या झाली होती. त्यांचे नेतृत्व करिश्माई होते. त्यांच्या हत्येचा तपास करणा-या वॉरेन आयोगाच्या तपासात ही हत्या एक माजी यूएस मरीन शार्पशूटर ली हार्वी ऑसवाल्डने केली असल्याचे समोर आले होते.
रॉबर्ट एफ. केनेडी हे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे धाकटे बंधू होते. त्यांची हत्या जून १९६८ मध्ये कॅलिफोर्नियामध्ये झाली होती. केनेडी डेमोक्रॅटिक अध्यक्षीय उमेदवारीसाठी प्रचार करत असताना सिरहान नावाच्या पॅलेस्टिनी-जॉर्डेनियन व्यक्तीने त्यांची हत्या केली होती.
मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांची हत्या एप्रिल १९६८ मध्ये मेम्फिस, टेनेसी येथे झाली होती. जेम्स अर्ल रे या एका सराईत गुन्हेगाराने किंग यांच्या हत्येचा गुन्हा कबूल केला होता. त्याला ९९ वर्षांची शिक्षा सुनावली गेली. त्याचा मृत्यू १९९८ मध्ये झाला.