मुंबई : नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटातील कलाकारांचे लूक समोर येत असताना आता अभिनेत्री लारा दत्ता आणि शीबा चड्ढा यांच्या भूमिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लारा दत्ता राणी कैकयीच्या भूमिकेत दिसत असून, तिचा गंभीर आणि प्रभावी अंदाज चर्चेचा विषय ठरला आहे. तर, शीबा चड्ढा मंथराच्या भूमिकेत दिसत असून, त्यांच्या लूकचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
‘रामायण’च्या निर्मात्यांनी अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लारा दत्ता आणि शीबा चड्ढा या दोघींचे फर्स्ट लूक शेअर केले आहेत. या पोस्टमधील कॅप्शनमधून दोन्ही पात्रांचे कथानकातील महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. लारा दत्ता हिने साकारलेल्या, कैकयी या पात्राचे वर्णन करताना निर्मात्यांनी एका राणीची, एका आईची आणि दोन वरदानांची कथा मांडली आहे. या दोन वरदानांमुळे रामाचे आयुष्य आणि त्याचे भविष्य कायमचे बदलणार असल्याचे कॅप्शनमधून सूचित करण्यात आले आहे.
दुसरीकडे, शीबा चड्ढा यांच्या मंथरा या पात्राचे वर्णन धूर्त बुद्धी आणि कुजबुजीमुळे घडणा-या घटनांशी जोडण्यात आले आहे. मंथरेच्या प्रभावामुळे एका आईच्या प्रेमाला आणि संपूर्ण साम्राज्याच्या भवितव्याला वेगळी दिशा मिळते, अशी या पात्राची झलक पोस्टमधून पाहायला मिळते. दोन्ही अभिनेत्रींच्या लूकमुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
२०२६ सालातील सर्वांत चर्चित चित्रपटांमध्ये रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चे नाव आहे. ग्लोबल स्टँडर्डवर तयार करण्यात येणारी ही मेगा-फिल्म यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.
या चित्रपटाचा प्रोड्यूसर नमित मल्होत्राने नुकतेच या चित्रपटाच्या ग्रँड बजेटबद्दल सांगितले होते. तब्बल ४ हजार कोटींमध्ये हा चित्रपट बनलाय. या चित्रपटाचा टीझर, ट्रेलर समोर आल्यावर सोशल मीडियावर त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. विशेषत: व्हीएफएक्सच्या वापरावरून सोशल मीडिया यूजर्सनी चित्रपटाला खूप ट्रोल केले आहे. याचदरम्यान आता मेकर्सनी या चित्रपटातील अत्यंत महत्त्वाच्या अशा दोन कलाकारांची ऑफिशिअल पोस्टर्स जारी केली आहेत.
















