नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यातच भाजपने २० उमेदवारांची यादी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीही अनौपचारिकपणे काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. मात्र महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. दरम्यान, आज काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत महाराष्ट्रातील ७ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शाहू महाराज, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, आमदार प्रणिती शिंदे, रवींद्र धंगेकर, बळवंत वानखेडे, नामदेव उसेंडी, गोवाल पाडवी आदींचा समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
राज्यात महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अजून सुटला नाही. त्यातच उद्धव ठाकरे यांनी तीन तर शरद पवार यांनी एका जागेवर उमेदवार जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या महाराष्ट्राच्या उमेदवारांबाबत दिल्लीत बैठक झाली. यामध्ये महाराष्ट्रातील ७ नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्या महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीत जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते. त्यानंतर कॉंग्रेस आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करू शकते, असे बोलले जात आहे.
चंद्रपूरच्या जागेसाठी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्याकन्या शिवानी वडेट्टीवार यादेखील इच्छूक होत्या. या दोघांनाही वगळून समोर भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार उमेदवार असल्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांन मैदानात उतरवले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. दुसरीकडे सोलापूर मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे या सर्व नावाची लवकरच घोषणा होऊ शकते.