22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयकॉंग्रेसमध्ये इन्कमिंग

कॉंग्रेसमध्ये इन्कमिंग

पप्पू यादव, लाल सिंह यांचा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलिन, बसपाचे खा. दानिश अलींना पक्षप्रवेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीपूर्वी जम्मूचे माजी भाजप नेते लाल सिंह आणि माजी खासदार पप्पू यादव यांनी आपापला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ३ राज्यांत बळ मिळाले. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पप्पू यादव यांच्या पक्षाचे विलीनीकरण आणि लाल सिंह यांचा काँग्रेसमध्ये समावेश करण्याची मागणी केली होती. बसपमधून निलंबित करण्यात आलेल्या यूपीमधील अमरोहामधील खासदार दानिश अली यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
लोकसभा निवडणुकीपूर्वी जम्मूचे माजी भाजप नेते लाल सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चौधरी लाल सिंह हे दोन वेळा उधमपूर मतदारसंघातून लोकसभेचे खासदार राहिले आहेत. त्यांनी २००४ आणि २००९ मध्ये उधमपूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता. लाल सिंह २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सामील झाले आणि नंतर पीडीपी-भाजप सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले. मात्र, कठुआ बलात्कार प्रकरणाच्या वादामुळे लाल सिंह यांना मंत्रीपद सोडावे लागले होते. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर लाल सिंह यांनी डोगरा स्वाभिमान संघटना हा स्वत:चा पक्ष स्थापन केला होता. हा पक्ष आता कॉंग्रेसमध्ये विलिन झाला. तसेच उत्तर प्रदेशातील अमरोहा लोकसभा खासदार दानिश अली यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दानिश अली हे बसपाचे खासदार आहेत. त्यांना पक्षविरोधी कारवायावरून निलंबित केले होते.

डॉ. जितेंद्र सिंह
यांच्याविरुद्ध उमेदवारी?
उधमपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार डॉ. जितेंद्र सिंह यांच्या विरोधात काँग्रेस चौधरी लाल सिंह यांना उमेदवारी देऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. चौधरी लाल सिंह यांची कठुआ जिल्ह्यात चांगली राजकीय पकड आहे. हा उधमपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

पप्पू यादव यांचा पक्षही विलिन
बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसची ताकद वाढली आहे. माजी खासदार पप्पू यादव यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. आम्ही लालू यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत २०२४ च्या लोकसभा आणि २०२५ च्या विधानसभा निवडणुका जिंकू, असे म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR