पाकूर : झारखंडच्या पाकूर जिल्हा मुख्यालयात असलेल्या केकेएम कॉलेजच्या वसतिगृहात शुक्रवारी रात्री पोलिसांनी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. यात १० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी पाकूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झारखंडमधील बांगलादेशी घुसखोरीविरोधात विद्यार्थ्यांनी आज निषेध रॅली काढण्याची घोषणा केली होती. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरा पोलीस अधिकारी वसतिगृहात पोहोचले आणि रॅली न काढण्यासाठी दबाव टाकला. मात्र विद्यार्थ्यांनी त्यांना नकार दिल्याने पोलिसांनी त्याला लाठ्याकाठ्याने जबर मारहाण करण्यात आली.
दुसरीकडे, पोलिसांचे म्हणणे आहे की, एका व्यक्तीचे अपहरण झाल्याच्या माहितीवरून पोलिसांचे पथक वसतिगृहात पोहोचले असता मोबाईल लोकेशन तपासत असताना विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. विद्यार्थी नेते कमल मुर्मू यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आधीच नियोजित निषेध रॅली थांबवण्यासाठी, एक पोलीस अधिकारी काल रात्री १०.३० वाजता वसतिगृहात आला आणि त्यांना सांगितले की रॅली काढू नका. याला विद्यार्थ्यांनी नकार दिला. यानंतर रात्री १ वाजण्याच्या सुमारास १०० हून अधिक पोलीस अधिकारी आणि शिपाई काठ्या घेऊन वसतिगृहात पोहोचले आणि विद्यार्थ्यांच्या खोल्या उघडून त्यांना मारहाण केली.
पाकूर नगर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक अनूप रोशन भेंगरा यांनी सांगितले की, उपनिरीक्षक नागेंद्र कुमार यांच्यासह पोलिसांचे पथक अपहरण प्रकरणाचा तपास करण्यासाठी वसतिगृहात पोहोचले होते, तेव्हा तेथे उपस्थित काही तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि अन्य एक जण जखमी झाला. दुस-यांदा पोलिस हल्लेखोरांना पकडण्यासाठी गेले असता सौम्य बळाचा वापर करण्यात आला. असे भेंगरा म्हणाले. दरम्यान या प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी आणि झारखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमर कुमार बौरी यांनी म्हटले आहे की, बांगलादेशी घुसखोरीविरोधात आवाज उठवल्याने हेमंत सरकार इतके घाबरले आहे की ते विद्यार्थ्यांवर हल्ले करत आहेत.