22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणात महायुतीतच लढत

कोकणात महायुतीतच लढत

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर राज्यात विधान परिषद निवडणूक हालचालींना वेग आला आहे. आता या निवडणुकीत वेगळीच रंगत पाहायला मिळणार आहे. कारण लोकसभेत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झालेली असताना आता कोकण विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच आमनेसामने आली आहे. कोकण विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २६ जून रोजी होत आहे. या निवडणुकीत मनसे, भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात लढत होणार आहे.

मनसेने कोकणातून अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली तर भाजपने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांची उमेदवारी घोषित केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवार जाहीर करून टाकला. शिवसेनेने संजय मोरे यांना उमेदवारी दिली. यामुळे कोकणात शिवसेना, भाजप आणि मनसे या महायुतीमधील तीन पक्षात लढत होणार आहे. भाजप आणि शिवसेना लोकसभा निवडणूक एकत्र लढले. त्यानंतर दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्यावर राज ठाकरे यांची मनसेही महायुतीत आली. भाजपचे आमदार असलेल्या या जागेवर आधी मनसेने आपला उमेदवार जाहीर केला. त्यानंतर भाजपने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनाही कोकण पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली. यामुळे महायुतीतच तिरंगी लढत रंगणार आहे.

राजेंद्र विखे मैदानात
नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत रंगत पाहायला मिळणार आहे. भाजपचे विवेक कोल्हे यांच्या पाठोपाठ आता भाजपचे नेते आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघात चुरस वाढल्याचे चित्र आहे. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आपण लढणार असल्याचे ते म्हणाले. आता येथे अधिकृत उमेदवारी कोणाला मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR