एकीकडे भारत हा कृषिप्रधान देश आहे, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हणायचे, त्याच्यावर शेतकरी राजा, बळिराजा अशी स्तुतिसुमने उधळायची, ‘जय जवान, जय किसान’ असा नारा द्यायचा आणि दुसरीकडे कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडे, लग्न यावर पैसा उधळता असे बरळत शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळायचे असे सरकारचे धोरण दिसते. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी तो पराक्रम करून दाखवला आहे. धरणात पाणीच नसेल तर मी काय करू असे म्हणणा-या पक्षाध्यक्षांच्या पक्षाचे कोकाटे हे सदस्य आहेत. तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षा ती काय करायची? ते असेच काही तरी बरळणार, वादग्रस्त विधाने करणार! याच महाशयांनी मागे एकदा बळिराजाला भिकारी म्हटले होते. जगाचा पोशिंदा भिकारी असतो काय? शेतक-यांची तुलना भिका-यांशी करणा-या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिवारी शेतक-यांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले. शेतकरी कर्ज घेतात आणि पाच-दहा वर्षे कर्जमाफीची प्रतीक्षा करतात. नियमित कर्जफेड करणा-यांनी काय करायचे, तुम्ही कर्जमाफीच्या पैशाचे काय करता, साखरपुडे, विवाह करीत फिरता असे धक्कादायक विधान कोकाटे यांनी केले. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांच्या शेताच्या बांधावर जाऊन कोकाटे यांनी पाहणी केली.
त्यावेळी शेतक-यांनी कर्जमाफीचा प्रश्न विचारला असता त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. कोकाटे यांच्या या विधानावर शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या नेत्यांनी सडकून टीका केली आहे. कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्याचे तुम्ही काय करता, कर्जमाफी दिल्यावर एक रुपयाची तरी शेतात गुंतवणूक केली का? सरकार आता शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार आहे. शेतीच्या पाईपलाईनसाठी, सिंचनासाठी पैसे मिळतात. सरकार भांडवली गुंतवणूक देते. शेतकरी या पैशाचा त्याच कामासाठी उपयोग करतो का, शेतकरी म्हणतो कर्जमाफी पाहिजे, विम्याचे पैसे पाहिजेत आणि करतात काय तर साखरपुडा आणि लग्न. या पैशाचा शेतीला काही उपयोग केला का, असा प्रश्न कोकाटे यांनी विचारला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कोकाटे यांच्यावर जोरदार टीका करताना त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी केली.
बळिराजा हा जगाचा पोशिंदा आहे, पण त्याचा अपमान करण्याची एकही संधी भाजप-युती सरकार सोडत नाही. कोकाटेंना सत्तेचा एवढा माज चढला आहे की, ते सातत्याने शेतक-यांचा अपमान करत आहेत. शेतक-यांना भिकारी म्हटल्यानंतर आता महाशयांनी कर्जमाफीचे काय करता, लग्न-साखरपुडे करता, शेतीत गुंतवता का? असा प्रश्न विचारून पुन्हा एकदा अपमान केला आहे. सत्तेत आल्यानंतर शेतक-यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते, ते अद्याप पाळलेले नाही. कर्जमाफीसाठी पैसे नाहीत असे सरकार म्हणते. त्यात कर्जमाफीवरून कृषिमंत्र्यांचा शेतक-यांना प्रश्न म्हणजे ‘चोर तो चोर आणि वरून शिरजोर’ असा प्रकार आहे. शेतक-याला सरकार मदत करते किंवा कर्जमाफी देते म्हणजे काही उपकार करत नाही. तो जनतेचा पैसा आहे, कोकाटेंच्या घरचा नाही. सरकारची धोरणे जर शेती व शेतक-याला अनुकूल असती तर शेतकरी सरकारच्या मदतीवर कशाला अवलंबून राहील? भाजप-युती सरकार हे शेतकरीविरोधी आहे.
कोकाटे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत असे सांगून सपकाळ म्हणाले, मंत्र्यांनी बोलताना तारतम्य बाळगावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे म्हणे, पण मंत्री हे मुख्यमंत्र्यांनाही जुमानत नाहीत, वाट्टेल ते बरळतात. फडणवीस सरकारमध्ये एक एक मंत्री म्हणजे नमुना आहे. कोकाटे हे त्यापैकीच एक! या मंत्र्यांना आवर घालायला हवा. शेतमालाला भाव नाही, हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत आहे. शेतकरी संकटात असून दररोज शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्याची कृषिमंत्री वा युती सरकारला लाज वाटत नाही, उलट शेतक-यांनाच अजब प्रश्न विचारले जातात. हा सत्तेचा माज शेतकरी नक्कीच उतरवतील. माणिकराव कोकाटे हे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा बनल्याची टीका शिवसेनेचे खासदार (उबाठा) संजय राऊत यांनी केली.
ते म्हणाले, गेली कित्येक वर्षे कोकाटे राजकारणात आहेत. त्यांनी शेतक-यांना दुखावणारी विधाने करू नयेत. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, कोकाटे यासारख्या लोकांना लगाम घातला पाहिजे. या तिघांच्या भाषणावरून त्यांनी कॉमेडी शो सुरू केलाय की काय असे वाटते. राज्याचे कृषिमंत्री रोज शेतक-यांची टिंगल करतात, खिल्ली उडवतात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, राज्याला बिनडोक कृषिमंत्री मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी शेतक-यांची तुलना भिका-यांसोबत केली होती. अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज असताना कृषिमंत्री मात्र बेताल वक्तव्य करत आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, कृषिमंत्री म्हणून शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांना आधार देणे गरजेचे आहे. मात्र हे सरकार संवेदनहीन आहे. सत्तेत आल्यानंतर शेतक-यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. ते अद्याप पाळलेले नाही. कर्जमाफीचा पैसा बँकेत जमा होतो.
शेतक-यांना मिळत नाही. कर्जमाफीचा पैसा साखरपुडा, लग्नकार्यात खर्च करणे हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका मिळवण्यासारखे सोपे नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केली. अवकाळी पावसाने शेतक-यांच्या तोंडातला घास पळवला आहे. अशा परिस्थितीत कृषिमंत्र्यांनी शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळणे अत्यंत दुर्दैवी म्हटले पाहिजे. शेतक-यांना भिकारी म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. लोकप्रतिनिधींना सर्व सुखसोयी दिलेल्या असतानाही त्यांनी आपल्या मानधनात नुकतीच भरघोस वाढ करून घेतली आहे, इथे खरा भिकारी कोण असा प्रश्न उपस्थित होतो. जगाच्या पोशिंद्याला तुम्ही भिकारी असे संबोधता, तुम्ही काय कमी आहात काय? वारेमाप आश्वासने देऊन सत्तेवर यायचे हा अलिकडे ट्रेंडच बनला आहे. आश्वासने पाळता येत नसतील तर ती द्यायची कशाला असा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो. निगरगट्ट राजकारण्यांना त्याचे कसलेही सोयरसुतक नसते!