बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे आज (बुधवार, ता. २ एप्रिल) बीडच्या दौ-यावर आहेत. आजच्या या दौ-यासाठी अजित पवार सकाळी ८ वाजताच बीडमध्ये पोहोचले. पोहोचताच ते या ठिकाणी आलेले पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत आणि इतर अधिका-यांवर संतापलेले पाहायला मिळाले. यानंतर त्यांनी जिल्ह्यातील पक्ष कार्यालयात जात तेथील पदाधिका-यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी युवा संवाद मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी उपस्थित पदाधिका-यांना, कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या तसेच दादागिरी खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांशी संवाद साधत म्हटले की, चुकीच्या माध्यमातून बीडकरांची बदनामी करणा-या गोष्टी आपल्याला थांबवायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करायचे आहे. समाजासमाजामध्ये, जातीजातीमध्ये निर्माण झालेला दुरावा दूर करावा लागेल. परंतु, आता यापुढे पक्षामध्ये कार्यकर्त्यांना घेत असताना त्यांचे रेकॉर्ड तपासून घ्यावे, अशी सूचना अजित पवारांनी केली. तर, बीडमध्ये येण्याआधी पोलिस अधीक्षकांना फोन करून काही मान्यवरांचे रेकॉर्ड मागितले आहे. कारण आपण ज्यावेळी लोकांना सांगतो असे वागले पाहिजे त्यावेळी आपल्या अवतीभोवती चुकीच्या प्रवृत्तीचे लोक असता कामा नयेत, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.
तसेच, यावेळी अजित पवारांनी तरुण कार्यकर्त्यांना विनंती करत म्हटले की, थोडे अंग झटकून काम करावे. काम करताना स्वत:ची प्रतिमा ही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. ती मलिन होता कामा नये, त्या प्रतिमेला गालबोट लागता कामा नये. चुकीच्या प्रवृत्तींनी आपल्याला खतपाणी घालण्याचे काम केले तर त्यांच्यापासून आपण दूर राहिले पाहिजे. त्याशिवाय, प्रचार, प्रसार आणि संघटन मजबूत करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा आपण वापर केला पाहिजे. पण तो वापर चांगल्या कामासाठी केला पाहिजे. तर, व्हॉट्सअॅपवरून काही पण चुकीचे पाठवू नका, ग्रामीण भागात सर्वांचे सर्वकाही बाहेर निघते. त्यामुळे कृपा करून मी फार पोचलेला आहे, अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका, हे असे चालणार नाही, असे यावेळी अजित पवारांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.
तर, कोणत्याही प्रकरणात तुम्ही अडकलात तर अशांना सोडवायला मी येणार नाही. उलट मीच पोलिसांना त्या व्यक्तीला टायरमध्ये घालून चोप द्यायला सांगेन. कारण मी काही लोकांना मकोका लावायला सांगितला आहे. मी अजिबात कोणाचीच दादागिरी खपवून घेणार नाही. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि विरोधी पक्षाची सुद्धा दादागिरी खपवून घेणार नाही. ज्यांचा राजकारणाशी काहीच संबंध नाही, अशांची दादागिरी पण खपवून घेणार नाही. ही बाब सगळ्यांनी ध्यानात घ्या, असे थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले आहे.