कोल्हापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर हा दुबईला पसार झाल्याची चर्चा एका फोटोवरून रंगली आहे. एक महिन्याहून अधिक काळापासून कोरटकर पोलिसांच्या हाती लागला नाही. कोरटकरला पोलिस खात्यातील काही जणांकडून मदत केली जातेय, असे बोलले जात आहे. त्यामुळे इंद्रजित सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे. चिल्लर माणूस पळून गेला, हे सरकारचे अपयश आहे, असे मत इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केले आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
इंद्रजित सावंत म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणा-यांना मदत करणा-या प्रवृत्ती असतील, त्या शोधून काढल्या पाहिजेत. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. हे शासनाने केले पाहिजे. हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे काम आहे.
मी कोल्हापुरात राहतो. माझा आणि कोरटकरचा आयुष्यात कधीही संबंध आला नाही. मग, माझा मोबाईल नंबर कोरटकरला कुणी दिला? हा एक तपासाचा भाग आहे. कोरटकरच्या फोनची चौकशी करायला हवी होती. पण, महिना झाला तपास केला जात नाही. माझी आशा कमी-कमी होत चालली आहे. मुख्यमंत्र्यांनी हा विषय चिल्लर आहे, असे समजू नये. मला शिवीगाळ केली, असा विषय समजू नये. महाराष्ट्रातील शिवप्रेमींची मने व्यथित झाली आहेत. याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी,’’ याकडे सावंत यांनी लक्ष वेधले आहे.
कुठलीतरी यंत्रणा कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे कोरटकरला अटक होत नाही. कोरटकर कसा पसार झाला, झाला की नाही, याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे,’’ अशी मागणी सावंत यांनी केली.