कोल्हापूर : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याला सोमवारी कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणात कारवाई करून जेरबंद केले. सध्या कोरटकर पोलिस कोठडीत असताना, त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले असल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली. मात्र, ही बातमी खोटी असल्याचे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी स्पष्ट केले.
प्रशांत कोरटकर याची उद्या २८ मार्च रोजी पोलिस कोठडी संपत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिस कोरटकर याचा कसून तपास करत आहेत. बुधवारी पहाटेपर्यंत कोरटकर याची पोलिसांनी चौकशी केली. यात इंद्रजित सावंत यांना त्याने स्वत:च फोन केला होता, अशी कबुली दिल्याची माहिती मिळत आहे. कोरटकरला राजारामपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. आज तिथून त्याला जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील कोठडीत हलविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.