कोल्हापूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंतांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला असून आज त्याला कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस स्टेशनला आणणण्यात आले. डीवायएसपी अजित टिक्के हे राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये आरोपीची कसून चौकशी करत आहेत. थोड्याच वेळात वरिष्ठ पोलिस अधिकारी कोरटकरला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहेत. मात्र त्यापूर्वीच जुना राजवाडा पोलिस स्टेशनबाहेर शिवप्रेमींची गर्दी उसळली आहे.
प्रशांत कोरटकर याचा निषेध करण्यासाठी शिवप्रेमी दाखल झाले असून ते संतप्त आहेत. एक शिवप्रेमी तर हातात कोल्हापुरी चप्पल घेऊनच पोलिस स्टेशनबाहेर उभा आहे. ९ नंबरचं पायताण मी घेऊन आलोय, ते बरोब्बर त्याच्या गालावर उठवायचं आहे अशी भावना एका इसमाने व्यक्त केली आहे. आम्ही सगळे शिवभक्त इतके संतापलो आहोत. ज्या पद्धतीने त्याने छत्रपतींचा अवमान केला आहे आणि ज्या पद्धतीने तो राजरोसपणे फिरतोय, जणू त्याला काही फरकच पडत नाही असा त्याचा आव आहे. म्हणून त्याला कोल्हापुरी हिसका दाखवण्यासाठी ही कोल्हापुरी चप्पल आणली आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
सध्या त्याला खरोखर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळताना दिसतेय, असा आरोपही शिवप्रेमींकडून केला जात आहे. आत्तापर्यंत कुठलाही आरोपी अटकेत असो, तेव्हा त्याला तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात नेतात, पण या कोरटकरला, चिल्लर माणसाला, तपासणी करण्यासाठी सरकारी दवाखान्यातले डॉक्टर पोलिस स्टेशनला आलेत, तो काय एवढा मोठा आहे? जावई आहे का? असा संतप्त सवालही शिवप्रेमींनी विचारला आहे.
कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, पण त्याच चिल्लर माणसाला शोधायला तुम्हाला एक महिना लागतो. त्यानंतरही त्याला ताब्यात घेतल्यावर त्याची मेडिकल टेस्ट ही पोलिस स्टेशनमध्येच केली जाते. हा तर गृहखात्याचा जावई असल्यासारखीच वागणूक त्याला मिळतेय, अशी टीका आणखी एका शिवप्रेमी इसमाने केली.
कोरटकरची भेट घेणारे पोलिस अधिकारी महेश कोंडावार अडचणीत
शिवरायांबद्दल गरळ ओकणारा प्रशांत कोरटकर याची चंद्रपुरात कथित भेट घेणारे पोलिस अधिकारी महेश कोंडावार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महेश कोंडावार हे चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख होते. मात्र त्यांची बरोबर पंधरा दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली. यामुळे नाराज असलेले गुंडावर तेव्हापासून कर्तव्यावर रुजू झालेले नाहीत. ते अजूनही रजेवर आहेत. दरम्यान, इंद्रजित सावंत प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकर हा अकरा मार्च रोजी चंद्रपुरात मुक्कामी आला असता त्याची भेट कोंडावार यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे.