पुणे : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा माणूस देश सोडून पळून कसा जाऊ शकतो? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे हे परवा अर्थमंत्र्यांनीच सभागृहात सांगितले आहे. त्यामुळे सरकारने औरंगजेबासारखे मुद्दे बाजूला करून राज्यातून बाहेर जाणारी गुंतवणूक थांबवावी आणि शेतक-यांच्या प्रश्नावर अधिक लक्ष द्यावे असे आवाहन देखील सुप्रिया सुळे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. असे गंभीर आरोप असलेला प्रशांत कोरटकर हा देश सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाने त्याचा अंतरिम जामीन फेटाळून लावल्यानंतर त्याच्या अटकेची कारवाई केली जाणार होती. कोल्हापूर पोलिस हे त्याचा शोध घेत होते, असे असताना नागपूरमधील प्रशांत कोरटकर हा देश सोडून जातो, हे राज्याच्या पोलिसांचे, गृहखात्याचे आणि राज्याच्या इंटिलिजन्सचे अपयश असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
पोलिस, गुप्तचर यंत्रणा, गृहमंत्री फेल
प्रशांत कोरटकरचा एक फोटो समोर आला आहे. त्यामध्ये तो दुबईला असल्याचे दिसत आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हा माणूस देश सोडून गेलाच कसा, नागपूरवरून दिल्लीला गेला आणि दिल्लीवरून दुबईला गेला अशी माहिती मिळत आहे. राज्य सरकारला त्याला शोधता येत नसेल तर त्यांनी केंद्राची मदत घ्यायला पाहिजे, हे मी आधीही सांगितले होते. आता पुन्हा सांगत आहे. एक माणूस नागपूरहून दिल्ली आणि दिल्लीतून बाहेर देशात निघून जातो तोपर्यंत राज्याचे पोलिस आणि गृहखाते काय करत होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
फक्त प्रशांत कोरटकर प्रकरणातच राज्याचे पोलिस, गृहखाते आणि इंटिलिजन्स फेल झालेले नाही, तर रोजच गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे आपल्याला वर्तमानपत्र आणि चॅनल्सवर दिसणा-या गुन्हेगारी बातम्यांवरून समोर येत आहे, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
सर्वाधिक गुन्हेगारी महाराष्ट्रात वाढली आहे. त्याबद्दल सरकार बोलत नाही. सुसंस्कृत नागपूरमध्ये दंगल घडते, आज सहा दिवस झाले तरी नागपूरमधील अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू आहे. काय सुरू आहे या महाराष्ट्रात? या सरकारचे १०० दिवसांचे रिपोर्ट कार्ड पाहिले तर या सरकारने मागील १०० दिवसांत राज्यामध्ये फक्त क्राईम वाढवला, याशिवाय यांच्या रिपोर्टकार्डवर काहीही लिहिलेले नाही, असा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.
शरद पवार डिसेंबरमध्ये बोलले ते आता खरे ठरत आहे..
बीडमध्ये सरपंचाचे हत्याकांड झाले त्यानंतर परभणीमध्ये कायद्याचे शिक्षण घेणा-या तरुणाचा पोलिस ठाण्यातील मारहाणीत मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमध्ये सर्वप्रथम शरद पवार त्या पीडित कुटुंबियांच्या भेटीला गेले. ते डिसेंबरमध्ये बीडलाही गेले आणि परभणीलाही गेले होते. शरद पवार डिसेंबरमध्ये जे बोलले होते, ते आज साडेतीन महिन्यांनी खरे होताना दिसत आहे. सरकारचे किती लोक बीड आणि परभणीला गेले? महादेव मुंडेंच्या पत्नीला सरकारचे किती लोक जाऊन भेटले? हा राजकारणाचा विषयच नाही, हा माणुसकीचा विषय आहे, असा टोलाही त्यांनी महायुती सरकारला लगावला.