मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबईत आतापर्यंत ५३ तर पुण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यामुळे कोरोना व्हायरसची दहशत पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी घाबरून जाऊ नका, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यात कोरोना वाढतोय अशा बातम्या मी पाहतोय. परंतु, राज्यात कोरोना वाढला तरी घाबरण्याचे काम नाही. सगळ्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढलेली आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे प्रकाश आबिटकर यांनी म्हटले. सध्या आरोग्य विभागाकडून मॅपिंग सुरू आहे. राज्य शासन सर्व आजारावर काम करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी सक्षम आहे. केईएम रुग्णालयातील ज्या दोन रुग्णांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला, तो कोरोनामुळे झालेला नाही. या दोन्ही रुग्णांना सहव्याधी (को-मॉर्बिडिटी) असल्याने त्यांचा मृ्त्यू झाला. सरकार पूर्णपणे अलर्टवर आहे. लोकांनी कुठेही घाबरू नये. केवळ को-मॉर्बिडिटी असलेल्या रुग्णांची काळजी घ्यावी लागते, असे प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
हाँगकाँगवरून येणा-या लोकांसाठी केंद्राकडून जर काही सूचना आली तर आम्ही त्याचे पालन करू. अद्याप केंद्र सरकारकडून तशा कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. पीएचसी संदर्भात आमचं काम सुरू आहे. काही पीएचसीचे बांधकाम सुरू आहे. ज्याठिकाणी काम पूर्ण झाले तेथे रुग्णांना सेवा देण्यास सुरुवात करू, अशी माहिती प्रकाश आबिटकर यांनी दिली.
हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये या व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. नव्या कोरोना व्हेरिएंटच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने ताप, खोकला (कोरडा किंवा कफयुक्त), घसा खवखवणे किंवा दुखणे, थकवा जाणवणे, अंगदुखी आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. यासोबतच काही वेळा सर्दी, नाक वाहणे, चव किंवा वास घेण्याची क्षमता कमी होणे अशी लक्षणेही दिसू शकतात. ही लक्षणे ब-याचदा सामान्य सर्दी-पडशासारखी असू शकतात आणि व्यक्तीनुसार बदलू शकतात. तर गंभीर परिस्थितीत श्वास घ्यायला त्रास होणे हे एक महत्त्वाचे धोक्याचे लक्षण आहे.
नव्या व्हेरिएंटची लक्षणे
हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये या व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्याप्रमाणावर आढळून आले आहेत. नव्या कोरोना व्हेरिएंटच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने ताप, खोकला (कोरडा किंवा कफयुक्त), घसा खवखवणे किंवा दुखणे, थकवा जाणवणे, अंगदुखी आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. यासोबतच काही वेळा सर्दी, नाक वाहणे, चव किंवा वास घेण्याची क्षमता कमी होणे अशी लक्षणेही दिसू शकतात. ही लक्षणे ब-याचदा सामान्य सर्दी-पडशासारखी असू शकतात आणि व्यक्तीनुसार बदलू शकतात. तर गंभीर परिस्थितीत श्वास घ्यायला त्रास होणे हे एक महत्त्वाचे धोक्याचे लक्षण आहे.
मुंबईतील रुग्णालयात बेड राखीव
मुंबईत पुन्हा कोरोना व्हायरसने डोके वर काढले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात ५३ कोरोना संक्रमित रुग्ण मिळाले आहेत. तसेच कोरोनाच्या संक्रमणामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये २० बेड आहेत. तसेच बालरोग आणि गर्भवती महिलांसाठी २० बेड आणि ६० सामान्य बेड आहेत. कस्तुरबा रुग्णालयात अतिदक्षता विभागात २ बेड आणि १० बेडचा वॉर्ड आहे. तसेच गरज पडल्यावर या रुग्णालयामधील क्षमता वाढवली जाणार आहे.