लातूर : प्रतिनिधी
कोरोनाच्या काळात आई-वडील किंवा त्यांच्यापैकी एकजण गमावलेल्या मूलांना शासनाकडून अर्थसहाय्यातून आधार दिला जात आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने दरमहा ४ हजार रुपयांची मदत देण्यात येते. लातूर जिल्ह्यातील २६७ अनाथ मुलांना ही मदत मिळत असून वयाच्या १८ वर्षांपर्यंत त्यांना हा आर्थिक लाभ मिळणार आहे.
पाच वर्षांपुर्वी संपुर्ण देशात कोरोनाने थैमान घातले होते. संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग पसरला होतो. लातूर जिल्ह्याला कोरोनाची लागण होणार नाही, याची सर्व खबरदारी घेतली गेली होती. सुरुवातीचा काळ लातूर कोरोनामुक्त होता. परंतु, इतर प्रांंतातून लातूरात आलेल्या प्रवाशांनी लातूरात कोरोना आणला आणि पाहता पाहता संपुर्ण लातूर जिल्हा कोरोनाच्या कवेत गेला. दररोज होणा-या आरटीपीसीआर व एन्टीजेन चाचण्यांतून शेकडो कोरोनाबाधित रुग्ण समोर आले. या रुग्णांवर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशसानाने केली. हजारो रुग्ण उपचारासाठी दाखल होत राहीले. त्यातील बहूतांश रुग्ण उचाराने बरे होऊन घरी परतले मात्र दुर्दैवाने काही रुग्ण दगावले.
कोरोनात आई-वडील किंवा त्यांच्यापैकी एकजण दगावल्याने असंख्ये बालके अनाथ झाली. लातूर जिल्ह्यात ४२० मुले अनाथ झाली. त्यापैकी २६७ मुलांना अर्थसहाय्य दिले जात आहे. या अनाथ मुलांचे व्यवस्थित संगोपन व्हावे, त्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी, त्यांचे शिक्षण सुरु राहावे याकरीता शासनाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आर्थिक मदत देण्यात येत आहे. या मुलांना वयाच्या १८ वर्षांपर्यंत दरमहा ४ हजार रुपये दिले जात आहेत. बालसंगोपन योजनेअंतर्गत २२४२ मुलांना दरमहा २ हजार २५० रुपयांची मदत देण्यात येत आहे. या रकमेच्या माध्यमातून त्यांचे संगोपन व शिक्षण व्हावे, म्हणून प्रयत्न करण्यात येत आहे.