बीड : प्रतिनिधी
कोरोना काळात बीड जिल्ह्यातील आरोग्य विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नमिता मुंदडांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांचे निलंबन केल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान, बीड इथल्या आरोग्य विभागात घोटाळा करण्यात आल्याचा आरोप नमिता मुंदडा यांनी आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला. कोरोना काळात बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा त्यांनी आरोप केल्यामुळे मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचे निलंबन करण्यात येत असल्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सदनात केली.
कोविड काळात बीड जिल्ह्यातील आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा आमदार नमिता मुंदडा यांनी करत अधिवेशनात लक्षवेधी मांडली. या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधिमंडळात बीडच्या शल्यचिकित्सकांचे निलंबन करण्यात येत असल्याची घोषणा केली. या प्रकरणी विभागीय चौकशी तीन महिन्यांत पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
औषध खरेदीमध्ये अनियमितता
कोविड काळात बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला, त्यात शल्यचिकित्सक दोषी आढळले. मात्र कारवाई करण्याऐवजी त्यांची नाशिकला बदली करण्यात आली. आता पुन्हा त्यांची बीड जिल्ह्यात बदली का करण्यात आली? दोषी असतील, तर डॉ. अशोक थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? डॉ. अशोक थोरात यांच्या कामकाजाबद्दल आक्षेप आहे. अशोक थोरात यांना निलंबित करून त्यांची चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करावी, अशी मागणीही नमिता मुंदडा यांनी केली आहे.