घनसावंगी : कोरोना काळात राजेश टोपे हे राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून लढले, असे गौरवोद्गारही अंधारे यांनी काढले. महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ घनसावंगी येथे आयोजित जाहीरसभेत सुषमा अंधारे यांनी महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडले. खासदार इम्रान प्रतापगडी, उमेदवार राजेश टोपे, खासदार संजय जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर स्कूल बसचालकाने लैंगिक अत्याचार केला. बदलापूर घटनेनंतर तब्बल बारा घटना राज्यात घडल्या आहेत. गृहमंत्र्यांकडून शून्य अपेक्षा असून ते लेकीबाळीला अजिबात सुरक्षा देऊ शकत नाहीत, अशा शब्दांत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयासमोर एक महिला येऊन तोडफोड करते तर मग प्रश्न उपस्थित होतोय की गृहमंत्र्यांची सुरक्षा इतकी कमकुवत असेल तर इतर लोकांचे काय? गृहमंत्री सुरक्षित नसतील तर महाराष्ट्राच्या लेकीबाळींना सुरक्षा कोण देणार? मंत्र्यांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा असेल तर निश्िचत ही चिंतेची बाब आहे. सुरक्षा भेदून अशा प्रकारे व्यक्ती येते हे दुर्दैव आहे.
फेसबुकला लाईव्ह करून गोळीबार करण्यात येतो.
आमदार बाबा सिद्दिकी यांची दिवसा हत्या करण्यात येते. लाडकी बहीण योजनेतून दीड हजार रुपये दिले, बहिणीला दिलेल्या पैशांचे भावाकडून क्रेडिट घेतले जात नाही. यामुळे तुम्ही क्रेडिट घेऊ नका, आपण कधी बहिणीला पैसे दिले म्हणून बॅनर लावलेत का? आपल्याला नात्यांची किंमत कळते, त्यांना बहिणीचे नाते कळत नाही, असा टोला अंधारे यांनी यावेळी महायुती सरकारला लगावला. या उलट त्यांनी बहिणीची थट्टा केली हे संस्कार नाहीत.