22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसंपादकीयकोलकाता विजेता!

कोलकाता विजेता!

साखळीतील ७० सामने आणि ३ प्ले ऑफ लढतीनंतर चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएलचा महामुकाबला होणार होता. तब्बल २ महिने रंगलेल्या या स्पर्धेची २६ मे रोजी रंगतदार सांगता होईल, अशी अपेक्षा होती; परंतु ती फोल ठरली. दोन वाघ भिडल्यानंतर गर्जनांनी आसमंत दणाणून सोडत थरारक झटापट पहावयास मिळेल, असे वाटले होते; परंतु तसे काही झाले नाही. महामुकाबला अगदीच मिळमिळीत अन् एकतर्फी झाला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाताने सनरायझर्सवर ८ विकेट्सने विजय मिळवला होता.

सनरायझर्सने दुस-या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सचे आव्हान परतवून लावत अंतिम फेरीत धडक मारली होती. यंदाच्या स्पर्धेत कोलकाता (केकेआर) संघ पहिल्या क्रमांकावर होता त्यामुळे अंतिम लढत केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद संघात होणार होती. केकेआरने फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर पहिला क्रमांक मिळविला होता. केकेआरने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएल करंडक उंचावला होता. यंदा गौतम गंभीरने मार्गदर्शक म्हणून केकेआरची जबाबदारी सांभाळली होती त्यामुळे गंभीरच्या मार्गदर्शनाखाली केकेआर तिस-यांदा जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला होता. पूर्वीच्या डेक्कन चार्जर्स संघाने २००९ मध्ये पहिल्यांदा आयपीएल चषक जिंकला होता. नंतर त्याचे सनरायझर्स हैदराबाद असे नामकरण झाल्यानंतर २०१६ मध्ये दुस-यांदा आयपीएलच्या जेतेपदावर मोहोर उमटवली होती. सनरायझर्सला २०१८ मध्ये जेतेपदाने हुलकावणी दिली होती. यंदा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआर आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद संघ अंतिम सामन्यात भिडणार होते. कोलकाताची भिस्त सुनील नरेन, आन्द्रे रसेल, श्रेयस आणि वेंकटेश अय्यर आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्तीवर होती. सुनील जबरदस्त फॉर्मात होता. त्याने १३ सामन्यात ४८२ धावा ठोकल्या होत्या आणि आयपीएलमधील पहिले शतकही ठोकले होते.

हैदराबादची भिस्त ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामीवीरांवर तसेच मधल्या फळीतील क्लॅसेनवर होती. हेडने १ शतक आणि ४ अर्धशतकांसह ५६७ तर अभिषेकने ४८२ धावा काढल्या होत्या. गोलंदाजीची धुरा कमिन्स आणि टी. नटराजनने सांभाळली होती. हेड-अभिषेक या सलामी जोडीच्या जोरावर हैदराबादने स्पर्धेत ३ वेळा अडीचशे पार मजल मारली होती. स्पर्धेत सर्वाधिक धावसंख्येचा विक्रमही हैदराबाद संघाच्या नावावर होता. प्रतिस्पर्ध्यांच्या उरात धडकी भरवणा-या फलंदाजांनीच हैदराबाद संघाला अंतिम सामन्यात दगा दिला. हैदराबादचा कर्णधार कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली; परंतु घडले भलतेच! मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात एका अफलातून चेंडूवर अभिषेक शर्माचा (२) त्रिफळा उडवला. पुढच्याच षटकांत वैभव अरोराने हेडला भोपळाही फोडू दिला नाही. या २ धक्क्यानंतर हैदराबाद संघ सावरूच शकला नाही. पहिल्या क्वालिफायर सामन्यात स्टार्कने हेडची दांडी उडवत त्याला भोपळा दिला होता तर वैभवने अभिषेकला बाद केले होते. स्टार्कने पाचव्या षटकांत राहुल त्रिपाठीला (९) तंबूचा रस्ता दाखवला होता तर हर्षित राणाने नितीश रेड्डीला (१३) माघारी धाडले.

क्लॅसेन-मार्करम जोडीवर अपेक्षा होत्या; पण अपेक्षाभंग झाला. राणाने क्लॅसेनला (१६) तर रसेलने मार्करमला (९) जाळ्यात अडकावले आणि हैदराबादची बघता बघता ८ बाद ९० अशी दारूण स्थिती झाली. कमिन्सने २४ धावा काढल्याने हैदराबादला किमान तीन अंकी धावसंख्या दिसू शकली. १८.३ षटकांत हैदराबाद संघ ११३ धावांत गारद झाला. आयपीएलच्या इतिहासात अंतिम सामन्यातील ही निचांकी धावसंख्या ठरली. खेळपट्टीचे वर्तन ओळखण्यात हैदराबादचे फलंदाज कमी पडले. चेपॉकची खेळपट्टी संथ होती. येथे धावांचे इमले चढवणे अवघड असते. शनिवारी येथे पाऊस झाला होता त्यामुळे वेगवान गोलंदाजांचे चेंडू स्वींग होत होते. फलंदाजांनी फटकेबाजी करण्याआधी थोडा संयम ठेवायला हवा होता. हैदराबाद संघाला ते जमले नाही. ११४ धावांचे माफक आव्हान कोलकाता संघाने १०.३ षटकांत २ फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पार केले. सुनील नरेन स्वस्तात बाद झाला. गुरबाझने ३९ धावांचे योगदान दिले. वेंकटेश अय्यर २६ चेंडूत ५२ धावांवर नाबाद राहिला. वेगवान गोलंदाजांच्या भेदक मा-याला फलंदाजांच्या फटकेबाजीची उत्तम साथ लाभल्याने कोलकाताने चेपॉक स्टेडियमवर तिस-यांदा ‘जीतबो रे’चा नारा घुमवला.

केकेआरने २४.७५ कोटी खर्चून स्टार्कला खरेदी केले होते. अंतिम सामन्यात तो सामनावीर ठरला. आयपीएलमध्ये पैशांचा अक्षरश: पाऊस पडतो. विजेत्या कोलकाता संघाला २० कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. उपविजेत्या हैदराबाद संघाला १३ कोटी, तिस-या क्रमांकावरील राजस्थान रॉयल्स संघाला ७ कोटी तर चौथ्या क्रमांकावरील रॉयल चॅलेंजर्सला ६.५ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. १७ वर्षाच्या आयपीएल इतिहासात बहुतेक वेळा अंतिम सामन्यात टॉस जिंकणारा संघ विजयी ठरला असल्याचे दिसून येते. १२ वेळा नाणेफेक जिंकणारा संघ विजयी ठरला तर ५ वेळा अपयशी ठरला. असे असले तरी क्रिकेट हा बेभरवशाचा खेळ आहे एवढे निश्चित. या खेळावर जगभरात मोठा सट्टा लावला जातो. भारतात बेटिंगला परवानगी नसली तरी जगभरात सट्टा चालतो. कॅनडाचा ३ वेळचा ग्रॅमी पुरस्कार विजेता रॅपर ड्रेकने केकेआरवर अडीच लाख डॉलर्सचा सट्टा लावला आहे म्हणे. यातून त्याला ४ लाख २५ हजार डॉलर्सचा फायदा होणार आहे. म्हणजे ड्रेकची चांदी होणार असली तरी भारतातील अनेक तरुण क्रिकेटपटूंना या स्पर्धेने मालामाल केले आहे एवढे खरे!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR