कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापुरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. सतत पडत असणा-या पावसामुळे कोल्हापुरातल्या गडमुडशिंगी गावात विहिरीच्या काठावर असणारे जुने नृसिंह मंदिर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मंदिरात पूजा करण्यासाठी बसलेले कृष्णात उमराव दांगटही (६४ वर्षे, दांगट मळा, गडमुडशिंगी) कोसळले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
कोल्हापुरातील गडमुडशिंगी येथे विहिरीच्या काठावर २० वर्षांपूर्वी एक छोटे नृसिंंह मंदिर उभारण्यात आले होते. कृष्णात उमराव दांगट आणि त्यांचे कुटुंबीय हे रोज नित्यनियमाने पूजा करीत असत. रोजच्याप्रमाणे आज सकाळी कृष्णा दांगट हे पूजेसाठी मंदिरात दाखल झाले. पूजा सुरू असतानाच अचानक हे मंदिर त्यांच्यासह विहिरीत कोसळले. या घटनेची माहिती मिळताच गावकरी, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाचे पथक दाखल झाले. या पथकाने विहिरीत कृष्णा दांगट यांचा शोध घेतला. त्यावेळी या दुर्घटनेत कृष्णात उमराव दांगट यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले.