पूर्णा : येथील नदी पात्रात शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधा-यात सिध्देश्वर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. परंतू या बंधा-यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने नदी पात्रातील पाणीसाठा वाहून जाणार आहे. त्यामुळे भविष्यात पुर्णेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. या पार्श्वभुमीवर बंधा-याची पाणी गळती तात्काळ थांबवावी अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष गोविंद राज ठाकर यांनी दिला आहे.
पूर्णा येथील कोल्हापुरी बंधा-यातून शहरातील ४० नागरीकांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु मागील महिन्यात शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर प्रशासनाने सिद्धेश्वर धरणातील २.२ क्युसेक्स लिटर पाणी पिण्यासाठी सोडले होते. पूर्णा नदी व कोल्हापुरी बंधारा पाहणी करण्यासाठी मनसे शहराध्यक्ष गोविंद राज ठाकर गेले असता कोल्हापुरी बांधा-यात मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू असल्याचे निदर्शनास आले.
अशीच पाणी गळती सुरू राहिल्यास एका महिन्याच्या आत नदीपात्रातील पाणी साठा वाहून जाईल व येणा-या दिवसात पूर्णा शहवासीयांना पाणी टंचाई समस्येला सामोरे जावे लागेल. याविषयी नगरपालिका प्रशासनाने व जलसंपदा विभागाने लक्ष देऊन तात्काळ पाणी गळती थांबवावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे शहराध्यक्ष गोविंद राज ठाकर यांनी दिला आहे.